Spread the love

नशिराबाद येथील सराईत गुन्हेगार ‘शोएब बिल्डर’ याच्यावर एमपीडीए कारवाई; येरवडा कारागृहात रवानगी

खुनाचा प्रयत्न, चोरीसह ७ गंभीर गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांची कारवाई

जळगाव : नशिराबाद परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार शोएब शेख गुलाम नबी उर्फ ‘शोएब बिल्डर’ (वय ३५, रा. ख्वाजा नगर, नशिराबाद) याच्याविरुद्ध पोलिसांनी एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह, येरवडा (पुणे) येथे करण्यात आली आहे.

शोएब बिल्डर याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, बेकायदेशीररीत्या गर्दी जमवून मारहाण करणे तसेच तडीपारी आदेशाचे उल्लंघन यांसारखे एकूण ७ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्याच्या कथित गुन्हेगारी कारवाया आणि परिसरातील वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांनी त्याच्याविरुद्ध MPDA कारवाईचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.

प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी शोएब बिल्डरला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये नशिराबाद पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. योगिता एम. नारखेडे, पोउपनि प्रिया दातीर, पो.हे.कॉ. गुणवंत देशमुख, पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे, पो.कॉ. भरत बाविस्कर, पो.कॉ. पंकज सोनवणे, पो.कॉ. प्रविण लोहार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ. सुनिल दामोदरे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू ठेवत पोलिसांनी नशिराबाद परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version