Spread the love

शिवरायांवर फिदा होती औरंगजेबाची मोठी मुलगी झेबुन्निसा?

* छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म सन्मान, स्त्री प्रति आदर या गुणांसह नीडरता, शौर्य आणि मातृभूमीप्रती असीम निष्ठेने मोहित!

> (आग्र्यात कळलेला हा इतिहासाचा नवा पैलू आहे, ज्याची पुष्टी तात्काळ आग्र्यात होऊ शकली नाही. मात्र, तिथे या दंतकथा अनेक पिढ्या असल्याचे स्थानिक बुजुर्ग कौम आणि मुस्लीम गाईडसुद्धा सांगतात.)

—-
* विक्रांत पाटील
Vikrant@Journalist.Com
—-

झेबुन्निसा (Zeb-un-Nisa) आणि शिवरायांच्या सुटकेची दंतकथा

* आग्र्यातील अनेक स्थानिक कथा आणि काल्पनिक साहित्यांमध्ये असा दावा केला जातो की, औरंगजेबाची मोठी मुलगी झेबुन्निसा ही शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आणि निर्भयतेवर मोहित झाली होती आणि तिने त्यांना आग्र्याहून निसटण्यास मदत केली. अर्थात हा निव्वळ काल्पनिक आणि रम्य कथांचा भाग आहे, असा काही मुघल इतिहास अभ्यासकांचा दावा आहे. समकालीन किंवा अधिकृत ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये (उदा. जयपूरची पत्रे, मुघल दफ्तर) झेबुन्निसाचा शिवाजी महाराजांच्या सुटकेशी काडीमात्र संबंध असल्याचा उल्लेख नाही, असा दावा काही मुघल इतिहास अभ्यासक करतात.

औरंगजेबाने झेबुन्निसाला दिलेली शिक्षा

* मुघल इतिहास संशोधकांना दाव्यानुसार, औरंगजेबाने आपली कन्या झेबुन्निसा हिला दिल्लीच्या सलीमगड किल्ल्यात 20 वर्षे नजरकैदेत ठेवले होते. मात्र, या शिक्षेचे खरे कारण शिवरायांना आग्र्याहून सुटकेत मदत करणे हे नव्हते. या अभ्यासकांच्या मते, इ.स. 1681 मध्ये औरंगजेबाचा मुलगा शहजादा मुहम्मद अकबर याने पित्याविरुद्ध बंड केले होते. झेबुन्निसाने त्या बंडात आपला भाऊ अकबर याला गुप्त पत्रे पाठवून पाठिंबा दिला होता. हा कट उघडकीस आल्यामुळे औरंगजेबाने संतापून तिला जन्मठेपेसारखी कैद दिली. याचा शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी कोणताही संबंध नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून चतुराईने सुटकेची घटना 1666 मध्ये घडली होती.

झीनत-उन-निसा (Zinat-un-Nisa) आणि संभाजी महाराजांचे कुटुंबीय

* औरंगजेबाची दुसरी कन्या झीनत-उन-निसा हिने पुढे जाऊन मराठा राजघराण्याला मदत केली होती, परंतु ती आग्र्यामध्ये नव्हती; इ.स. 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जेव्हा राणी येसूबाई आणि बाल शाहू महाराज (संभाजी महाराजांचे पुत्र) मुघलांच्या कैदेत गेले, तेव्हा झीनत-उन-निसाने बाल शाहू महाराजांना स्वतःच्या मुलाप्रमाणे ममतेने वागवले, त्यांची काळजी घेतली आणि मुघल छावणीत त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून प्रयत्न केले. संभवतः या प्रसंगाची गल्लत संभाजी महाराजांच्या बालपणाशी केली जाते, असे मुघल इतिहास अभ्यासकांचे मत आहे.

—-
* विक्रांत पाटील
Vikrant@Journalist.Com
—-

शिवरायांच्या आग्रा सुटकेतील काही तथ्य

* इतिहास संशोधक आणि खुद्द भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने म्हणजेच एएसआयने देखील मान्य केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा किल्ल्याच्या आत कैदी नसून, किल्ल्याबाहेरील जयपूरच्या राजांच्या हवेलीतच नजरकैदेत होते आणि तिथूनच त्यांनी ही अभूतपूर्व सुटका करून घेतली. आग्रा किल्ल्यात महाराजांनी दाखविलेल्या स्वाभिमानी बाण्यानंतर अपमानित औरंगजेबाने त्यांना आग्रा किल्ल्याबाहेर, मिर्झाराजा जयसिंग यांचे सुपुत्र कुंवर रामसिंग यांच्या हवेलीत नजरकैदेत ठेवले. त्याला ‘जयपूर हाऊस’ किंवा राजा जयसिंग/मानसिंग यांची हवेली म्हणूनही ओळखले जाई. ही हवेली किल्ल्यापासून काही अंतरावर यमुना नदीकाठाजवळ होती. आग्रा किल्ल्याची तटबंदी इतकी अभेद्य होती की, तेथून कोणाचीही सुटका होणे केवळ अशक्य होते. शिवरायांना जर त्या किल्ल्यात डांबले असते, तर तिथून निसटणे अत्यंत कठीण ठरले असते. या घटनेने मुघल साम्राज्याची अब्रू संपूर्ण भारतात धुळीस मिळवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आणि बुद्धीचातुर्याची कीर्ती जगभर पसरली. इथे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांनी आग्र्याच्या कैदेत दाखवलेले साहस हा जगातल्या इतिहासातील स्वामीनिष्ठेचा आणि बलिदानाचा सर्वात मोठा आणि अद्वितीय नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हवेलीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी या दोन मावळ्यांनी थेट स्वतःच्या मृत्यूच्या दाढेत उडी घेतली होती. (VP)

Share.
Leave A Reply

Exit mobile version