Spread the love

नाहाटा महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त प्राध्यापकांचा गुणगौरव

पीएच.डी., नेट-सेट, पेटंट व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार

भुसावळ : येथील नाहाटा महाविद्यालयात स्टाफ अकॅडमी आणि स्टाफ अँड स्टुडंट्स वेल्फेअर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहनभाऊ फालक होते. यावेळी चेअरमन श्री. महेशभाऊ फालक, कोषाध्यक्ष श्री. संजयकुमारजी नाहाटा, प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. दीपक पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी मागील वर्षात पीएच.डी., नेट-सेट, पेटंट तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित करून शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संचालक मंडळातर्फे गौरव करण्यात आला.

आधुनिक युगात शिक्षकांची जबाबदारी महत्त्वाची

५ सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. रश्मी शर्मा यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर तसेच आधुनिक युगातील शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी काव्याच्या माध्यमातून ‘आदर्श शिक्षक कसा असावा’ यावरही भाष्य केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोहनभाऊ फालक यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत डिजिटल युगातील शिक्षकांची वाढती जबाबदारी अधोरेखित केली. तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात शिक्षकांनी ज्ञान, मूल्ये आणि संस्कार यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांना घडविण्याची भूमिका बजावावी, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ अकॅडमी समितीचे प्रमुख प्रा. डॉ. एस. टी. धूम यांनी केले. सूत्रसंचालन पी. ए. अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रफुल्ल इंगोले यांनी केले. गुणगौरव यादीचे वाचन डॉ. मनोज कुमार जाधव व डॉ. ममता पाटील यांनी केले.

समिती सदस्यांचे परिश्रम

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रबंधक श्री. भगवान तायडे व कार्यालयीन अधीक्षक श्री. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ अकॅडमी आणि स्टाफ अँड स्टुडंट्स वेल्फेअर कमिटीच्या डॉ. एस. के. राठोड, डॉ. सचिन येवले, डॉ. गौरी पाटील, डॉ. जितेंद्र आडोकार, प्रा. सुनील अडकमोल, डॉ. किरण वारके यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सन्मानामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे आणि प्रेरणादायी वातावरण लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version