Spread the love

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कास्ट्राईब महासंघाचे आंदोलन स्थगित

८ सप्टेंबरला आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक; मागण्या मान्य न झाल्यास २३ सप्टेंबरपासून नाशिकमध्ये तीव्र बेमुदत आंदोलनाचा इशारा

नाशिक : विद्यार्थ्यांच्या जीवित, आरोग्य आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, पुणे यांच्या वतीने नाशिक येथील गोल्ड क्लब, इदगाह मैदान येथे ५ सप्टेंबरपासून प्रस्तावित करण्यात आलेले बेमुदत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

आदिवासी विकास आयुक्तालय स्तरावरील बैठकीचे इतिवृत्त महासंघाला प्राप्त झाले असून, प्रमुख धोरणात्मक मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत ८ सप्टेंबर २०२६ रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या अधिकृत पत्राच्या पार्श्वभूमीवर महासंघाने ५ सप्टेंबरपासून सुरू होणारे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

८ सप्टेंबरच्या बैठकीत मागण्यांवर चर्चा

आगामी बैठकीत महासंघाने यापूर्वी २८ जुलै २०२६ आणि १ सप्टेंबर २०२६ रोजी सादर केलेल्या पत्रांमधील मागण्यांसह विद्यार्थ्यांच्या जीवित, आरोग्य आणि सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ तात्पुरत्या उपाययोजनांपुरता मर्यादित न ठेवता त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी भूमिका महासंघाने घेतली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास २३ सप्टेंबरपासून आंदोलन

दरम्यान, ८ सप्टेंबरच्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक व ठोस निर्णय न झाल्यास २३ सप्टेंबर २०२६ पासून नाशिक येथील पूर्वनियोजित ठिकाणी बेमुदत आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव सुशील तायडे यांनी दिला आहे.

त्यामुळे ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीकडे विद्यार्थी सुरक्षा आणि कर्मचारी संघटनेच्या मागण्यांच्या दृष्टीने लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version