वर्गखोलीत शिरला धामण; दहीहंडीमुळे विद्यार्थी दुसऱ्या वर्गात, मोठा अनर्थ टळला!
सर्पमित्र समाधान गोसावी यांचा तत्पर रेस्क्यू; अवघ्या २० मिनिटांत सापाला सुरक्षितपणे पकडले
बोदवड, दि. ५ सप्टेंबर : नाडगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वर्गखोलीत धामण जातीचा साप शिरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, याचवेळी शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम सुरू असल्याने सर्व विद्यार्थी दुसऱ्या वर्गखोलीत उपस्थित होते. त्यामुळे साप शिरलेल्या वर्गात एकही विद्यार्थी नसल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.
शाळेच्या वर्गखोलीशेजारी असलेल्या धर्मशाळेसमोरील झाडावरून साप खाली पडला. पोषण आहार शिजविणाऱ्या वैशाली ताई पाटील यांच्या निदर्शनास हा साप आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर शाळेतील शिक्षक महेंद्र पाटील, गोवर्धन सर तसेच शेजारील के. जी. पाटील हायस्कूलचे शिक्षक अंकित पाटील, कल्याण पाटील, कर्मचारी अनिल पौळ, सुरेश प्रजापती आणि नरेंद्रसिंग पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत साप वर्गखोलीत शिरला होता.
दरम्यान, शाळेत बाल विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी दुसऱ्या वर्गखोलीत असल्याने साप शिरलेल्या खोलीत कोणताही विद्यार्थी उपस्थित नव्हता. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच शिक्षक महेंद्र पाटील व अंकित राजपूत यांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला. शिवसैनिक अमोल व्यवहारे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिरसाळा येथील सर्पमित्र समाधान गोसावी यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच गोसावी यांनी वेळ न दवडता नाडगावकडे रवाना होत अवघ्या २० मिनिटांत शाळेत पोहोचून सापाचा सुरक्षितपणे रेस्क्यू केला.
रेस्क्यू करण्यात आलेला साप धामण जातीचा असून तो बिनविषारी असल्याची माहिती सर्पमित्र समाधान गोसावी यांनी दिली. सापांविषयीचे गैरसमज आणि अंधश्रद्धेमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होते. त्यामुळे साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच, सर्पदंश झाल्यास कोणत्याही अंधश्रद्धेच्या आहारी न जाता तात्काळ जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले.
शनिवारी सुट्टीच्या दिवशीही सर्पमित्राची सेवा
सर्पमित्र समाधान गोसावी हे शिरसाळा येथील रहिवासी असून जळगाव एमआयडीसी येथे काम करतात. प्रत्येक शनिवारी सुट्टीच्या दिवशी ते शिरसाळा येथील हनुमान मंदिरात सेवेकरी म्हणून उपस्थित राहत असतात. नाडगाव येथे साप आढळला त्यावेळी स्थानिक सर्पमित्र बाहेरगावी असल्याने अमोल व्यवहारे यांनी गोसावी यांना माहिती दिली.
माहिती मिळताच त्यांनी वेळ न दवडता शिरसाळा ते नाडगाव प्रवास करून अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचत सापाचा सुरक्षित रेस्क्यू केला. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
