Spread the love

“रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो काढता, स्वतःच्या चेहऱ्यावरील खड्डेही बघा!”; आमदार अनुप अग्रवालांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

धुळ्यात कान्हादेश शिल्पाचे अनावरण; स्टेशन रोड चौक सुशोभित, रावेरच्या वनजमिनीच्या हस्तांतरणानंतर एमआयडीसीच्या कामाला लवकरच सुरुवात

धुळे : धुळे शहरातील स्टेशन रोड चौकात आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या भव्य कान्हादेश शिल्पाचे अनावरण आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या शिल्पामुळे स्टेशन रोड चौकाच्या सौंदर्यात भर पडली असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणखी एका कामाची भर पडली आहे.

या कार्यक्रमावेळी बोलताना आमदार अनुप अग्रवाल यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “सट्ट्याच्या पेढ्या आजपासून सुरू झाल्या आहेत का?” असा सवाल करत त्यांनी गेल्या दीड वर्षात अवैध धंद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्याचा दावा केला.

“जेवढ्या कारवाया गेल्या दीड वर्षात झाल्या, तेवढ्या आजपर्यंत झाल्या नाहीत. या कारवाया आमच्या कार्यकाळात झाल्या आहेत, हे विरोधकांनी सांगायला हवे,” असे म्हणत अग्रवाल यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

“खड्ड्यांचे फोटो काढून रील बनवण्यापेक्षा विकासकामेही पाहा”

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही आमदार अग्रवाल यांनी प्रत्युत्तर दिले. “सध्या फक्त एखाद्या रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो काढायचा आणि त्याची रील बनवायची. रस्त्यावरील खड्डे बघताना स्वतःच्या चेहऱ्यावरील खड्डेही बघून घ्या,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून त्याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

रावेरच्या वनजमिनीचे महसूलकडे हस्तांतरण

यावेळी आमदार अग्रवाल यांनी रावेर येथील वनविभागाच्या जमिनीच्या हस्तांतरणाबाबतही महत्त्वाची माहिती दिली. वनविभागाची जमीन महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असून त्याबाबतचे गॅझेटही सरकारकडून काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रक्रियेमुळे रावेर येथे लवकरच मोठ्या एमआयडीसीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. तसेच धुळे शहरातील विविध भागांत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“सर्वत्र विकास सुरू आहे; मात्र या विकासकामांचा गवगवा कुणीच करणार नाही,” असे म्हणत त्यांनी सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली आणि त्याचवेळी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर मायादेवी परदेशी, नगरसेवक अमोल मासुळे, नगरसेविका सुरेखा उगले, नगरसेवक धीरज परदेशी, भगवान गवळी, नगरसेविका चित्रलेखा परदेशी, माजी महापौर तथा नगरसेविका जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, प्रदीप करपे, मोहन नवले, चंद्रकांत सोनार, डॉ. सुशील महाजन यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version