Spread the love

सोयगावसह तीन गावांत डेंग्यूचे पाच रुग्ण; तालुक्यात आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

सर्दी, खोकला, ताप, उलटी, जुलाबाच्या रुग्णांचीही वाढ; ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखाने गर्दीने फुलले, स्वच्छता व धूरफवारणीअभावी नागरिकांचा रोष

सोयगाव शहर प्रतिनिधी : विजय पगारे

सोयगाव : सोयगाव तालुक्यात सध्या डेंग्यू, ताप, सर्दी-खोकला, उलटी आणि जुलाबाच्या आजारांनी नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे. सोयगाव, आमखेडा आणि गलवाडा या तीन ठिकाणी डेंग्यूचे पाच रुग्ण आढळून आले असून ते सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. धनाजी खंडारे यांनी दिली. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, तालुक्यातील अनेक गावांमध्ये अस्वच्छता, साचलेले पाणी आणि दुर्गंधीचे वातावरण असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून आरोग्य विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गावागावांत आजारांचे रुग्ण; दवाखान्यांमध्ये गर्दी

तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्दी, खोकला, ताप, उलटी आणि जुलाबाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. सोयगाव ग्रामीण रुग्णालयासह शहरातील खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

गावागावांत नियमित साफसफाई, नाल्यांची स्वच्छता आणि धूरफवारणी होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोयगाव शहरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

सोयगाव शहरात नाल्या तुंबणे, नाल्यांमध्ये दुर्गंधी असणे तसेच रस्त्याच्या कडेला कचरा साचणे अशा समस्या असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी गाजर गवत व झुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरपंचायतीकडून शहराच्या साफसफाईसाठी दरमहा मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असतानाही अपेक्षित स्वच्छता होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. धूरफवारणी आणि पाण्याची तपासणी नियमितपणे करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ग्रामपंचायतींमध्येही स्वच्छतेचा अभाव?

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासकीय व्यवस्था कार्यरत असल्याने गावांच्या दैनंदिन कारभारावर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही गावांमध्ये नियमित साफसफाई, नाल्यांची स्वच्छता आणि धूरफवारणी होत नसल्याने अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाल्याची तक्रार आहे.

फर्दापूर ते चाळीसगाव या प्रमुख मार्गावरील काही तांडे-वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी रस्त्यालगत नैसर्गिक विधी होत असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप आहे. गावातील शाळांच्या परिसरातही अस्वच्छता आणि नैसर्गिक विधीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

“आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; अधिकाऱ्यांची भेट घेणार”

तालुक्यातील आरोग्यविषयक परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न मांडणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप मचे यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींमध्ये नियमित साफसफाई व धूरफवारणी होत नसल्याच्या तक्रारी असून, सोयगाव नगरपंचायतीकडून साफसफाईवर खर्च होत असतानाही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले. संबंधित विभागाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे मचे यांनी सांगितले.

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

डेंग्यूसह ताप व इतर आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, पिण्याचे पाणी उकळून प्यावे आणि घराच्या खिडक्यांना जाळी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version