बालविवाह निर्मूलनासाठी २७ नोव्हेंबर ‘आंतरराष्ट्रीय दिवस’ घोषित
संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयाचे आधार बहुउद्देशीय संस्थेकडून स्वागत; जळगाव जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध व जनजागृती अभियान अधिक प्रभावी करण्याचा निर्धार
भुसावळ, जि. जळगाव, दि. ५ सप्टेंबर २०२६ : संयुक्त राष्ट्रसंघाने २७ नोव्हेंबर हा दिवस ‘बाल, अल्पवयीन आणि सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित केल्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे आधार बहुउद्देशीय संस्थेने स्वागत केले आहे.
बालविवाह निर्मूलनासाठी कार्यरत असलेली आधार बहुउद्देशीय संस्था ही Just Rights for Children (JRC) नेटवर्कची भागीदार संस्था आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयामुळे भारतातून सुरू झालेल्या बालविवाह निर्मूलनाच्या अभियानाला जागतिक स्तरावर ऐतिहासिक मान्यता मिळाल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
बालविवाहविरोधी जनजागृतीला मिळणार नवी दिशा
बालविवाह ही बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासावर परिणाम करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे काम सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला.
जळगाव जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध, जनजागृती आणि बालकांच्या शिक्षणासाठी संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहील, असे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
निर्णयाचे स्वागत
संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयाचे आधार बहुउद्देशीय संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद आणि प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी स्वागत केले.
या प्रसंगी आनंद पगारे, मोहिनी धनगर, दिपाली सुनील हिवाळे आणि सुनील जगन हिवाळे उपस्थित होते.
बालविवाहमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी शासन, सामाजिक संस्था, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून, आंतरराष्ट्रीय दिवसाच्या घोषणेमुळे या विषयावर जागतिक पातळीवर जनजागृतीला अधिक बळ मिळणार असल्याचे संस्थेच्या वतीने नमूद करण्यात आले.
