उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीला दिग्गजांची हजेरी; फाईट ग्रुपच्या दहीहंडीत तरुणाईची रेकॉर्डब्रेक गर्दी!
दहीहंडीतून सर्वधर्म समतेचा संदेश; पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह दिग्गजांच्या शुभेच्छा, डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष
धुळे प्रतिनिधी :
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाईट ग्रुपच्या दहीहंडी उत्सवाला यंदा तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री, आमदार, खासदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने प्रकाश टॉकीज चौकातील दहीहंडीचा उत्सव चांगलाच रंगला. आकर्षक दहीहंडी, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि सर्वधर्म समतेचा संदेश हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले.
सामाजिक कार्यकर्ते तथा फाईट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नाना साळवे यांच्या माध्यमातून धुळे शहरातील प्रकाश टॉकीज चौकात प्रथमच या भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. फाईट ग्रुपमध्ये विविध जाती-धर्मातील तरुणांचा सहभाग असल्याने ‘समतेची दहीहंडी’ म्हणून या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
दिग्गजांची हजेरी; तरुणाईचा उत्साह द्विगुणित
दहीहंडी उत्सवाला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्राचे नेते अविष्कार भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
दिग्गजांच्या उपस्थितीमुळे तरुणाईचा उत्साह आणखी वाढला. डीजेच्या तालावर सुरू असलेल्या जल्लोषात अनेक मान्यवरांनाही ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी ‘हत्ती घोडा पालखी, जय कन्हैयालाल की’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सर्वधर्म समतेचा संदेश
फाईट ग्रुपच्या दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध जाती-धर्मातील तरुणांचा असलेला सहभाग. या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि सर्वधर्म समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या अभिनव उपक्रमाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह उपस्थित दिग्गजांनी कौतुक केले. सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
रात्री दहा वाजेपर्यंत जल्लोष
सायंकाळी ७ वाजेपासून सुरू झालेला दहीहंडी उत्सव रात्री १० वाजेपर्यंत उत्साहात सुरू होता. परिसरात मोठ्या संख्येने तरुणाई आणि नागरिकांची गर्दी झाली होती.
अखेर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पैलवान रावसाहेब गिरासे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडी फुटताच उपस्थितांनी जल्लोष करत उत्सवाचा आनंद लुटला.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्राचे नेते अविष्कार भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आयोजक नाना साळवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महापौर मायादेवी परदेशी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पैलवान रावसाहेब गिरासे, किरण जोंधळे, भाजप शहराध्यक्ष गजेंद्र अंपलकर, सतीश महाले, नगरसेवक सुनील बैसाने, ललित माळी, सुमित शिंदे, योगेश पाटील, पैलवान बापू अहिरे, मनोज पारेराव, पप्पू पगारे, विजय अहिरे, गोविंदा गरुड आणि राहुल साळवे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिग्गजांची उपस्थिती, तरुणाईची रेकॉर्डब्रेक गर्दी, डीजेचा जल्लोष आणि सर्वधर्म समतेचा संदेश यामुळे फाईट ग्रुपची दहीहंडी धुळे शहरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरली.
