Spread the love

ईको वाहनांचे सायलेंसर चोरणारी उत्तर प्रदेशातील टोळी पारोळा पोलिसांच्या जाळ्यात

मौल्यवान प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडियमच्या चोरीचा डाव उधळला; दोन आरोपी अटकेत, ६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पारोळा प्रतिनिधी हर्षल पाटील : ईको वाहनांच्या सायलेंसरमधील Catalytic Converter मध्ये असलेले प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम हे मौल्यवान धातू चोरण्याच्या तयारीत असलेल्या उत्तर प्रदेशातील टोळीचा पारोळा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मारुती वॅगनार कार, ईको वाहनांचे सायलेंसर, मौल्यवान धातू तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गोपनीय माहितीवरून पोलिसांची नाकाबंदी

५ सप्टेंबर २०२६ रोजी पारोळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत काही संशयित इसम ईको वाहनांचे सायलेंसर चोरून त्यातील मौल्यवान धातू काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानंतर परिसरात नाकाबंदी करून संशयित वाहनांचा शोध सुरू करण्यात आला.

महामार्गावर संशयास्पद वॅगनार अडवली

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील म्हसवे गावाजवळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणारी मारुती वॅगनार कार (क्र. DL-3-CBU-3358) पोलिसांनी अडवली. कारमध्ये असलेल्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे यासिफ यामीन चौधरी (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगढ, उत्तर प्रदेश) अशी सांगितली.

वाहनाची झडती घेतली असता पोलिसांना सायलेंसर काढण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी टॉमी, हातोडा, रिंच सेट, ईको वाहनांचे तीन सायलेंसर तसेच एका थैलीत दहा कॅरीबॅग आढळून आल्या.

या कॅरीबॅगमध्ये सायलेंसरमधील प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडियम धातूचा साठा आढळून आला. पारोळा तालुक्यातील रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या ईको वाहनांचे सायलेंसर चोरी करून त्यातील मौल्यवान धातू काढण्याचे नियोजन असल्याची माहिती तपासात समोर आली.

६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला—

  • मारुती वॅगनार कार – ₹४ लाख
  • मौल्यवान धातू असलेल्या १० कॅरीबॅग – ₹१ लाख ५० हजार
  • ईको वाहनांचे ३ सायलेंसर – ₹७५ हजार
  • इन्फिनिक्स मोबाईल – ₹१० हजार
  • सायलेंसर चोरीचे साहित्य – टॉमी, हातोडा, रिंच सेट आदी

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत – ₹६ लाख ३५ हजार.

दोघांना अटक; पुढील तपास सुरू

पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे करीत आहेत.

ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सपोनि अशोक पिंपळे, पोलीस उपनिरीक्षक विजय बोंबे व त्यांच्या पथकाने केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version