Spread the love

लोकसहभागातून स्मशानभूमी परिसराची स्वच्छता

कोल्हाडीतील युवकांचा पुढाकार; स्वखर्चातून गवत कापणी व फवारणी, मूलभूत सुविधांची नागरिकांची मागणी

बोदवड प्रतिनिधी : कोल्हाडी गावातील सुमारे दोन एकर परिसरात असलेल्या स्मशानभूमीची नागरिक व युवा वर्गाच्या पुढाकारातून स्वच्छता करण्यात आली. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत आणि झाडाझुडपांमुळे स्मशानभूमीचा परिसर जंगलमय झाला होता. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने परिसराची साफसफाई करून वाढलेल्या गवतावर फवारणी केली.

स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने येथे नेहमीच गारवा आणि निसर्गरम्य वातावरण असते. मात्र, दिवाबत्ती, पाणी आणि नियमित स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांकडे पुरेसे लक्ष नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

गावातील एखाद्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना पोहोचण्यास विलंब झाल्यास अंत्यसंस्कार रात्री उशिरापर्यंत करण्याची वेळ येते. अशावेळी स्मशानभूमीत पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अंत्यविधीसाठी उपस्थित नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

स्मशानभूमी ही गावातील प्रत्येक नागरिकाच्या भावना आणि संस्कारांशी जोडलेली महत्त्वाची जागा आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने येथे नियमित स्वच्छता, पुरेशी दिवाबत्ती, पाण्याची व्यवस्था आणि पावसाळ्यात वाढणाऱ्या गवताची वेळोवेळी फवारणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, गावातील नागरिक व युवा वर्गाने सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत चर्चा केली. कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम किंवा प्रसिद्धीचा हेतू न ठेवता, गरजेच्या वेळी समाजोपयोगी काम करून माणुसकीचे दर्शन घडवावे, या भावनेतून स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार युवकांनी स्वखर्चाने फवारणी करून परिसर स्वच्छ केला.

या सामाजिक उपक्रमात श्रीकृष्ण राणे, योगेश झांबरे, भगवत चोपडे, वैभव राणे, कार्तिक निकम, भगवान भिल, सुरज राणे, गणेश खडसे, नयण राणे आणि नामदेव लढे यांनी परिश्रम घेतले. नागरिकांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version