Spread the love

नशिराबाद पोलिसांचा पहाटेचा ‘खाक्या’: गुन्हेगारांवर अचानक धाड; वॉरंटमधील आरोपीसह हद्दपार

हिस्ट्रीशीटर जेरबंद, २७ संशयित वाहने जप्त!

नशिराबाद (प्रतिनिधी) : परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नशिराबाद पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास जोरदार कोम्बिंग ऑपरेशन राबविले. पहाटे ३ ते ५.३० वाजेपर्यंत विविध ठिकाणी अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलिसांच्या पथकाने ही धडक मोहीम राबविली.

‘खाक्या’

पहाटे अचानक छापे; संशयितांची झाडाझडती

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी विविध पथके तयार करून पहाटेच्या अंधारात संशयित ठिकाणे तसेच गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर अचानक तपासणी केली. या कारवाईदरम्यान न्यायालयीन वॉरंट असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली.

याशिवाय पोलिसांनी ३ हद्दपार इसमांची तपासणी केली. तसेच ५ हिस्ट्रीशीटर आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील ३ आरोपींची कसून झडती व चौकशी करण्यात आली.

२७ संशयित वाहने पोलिसांच्या ताब्यात

कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पहाटेच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरताना आढळलेल्या तसेच आवश्यक कागदपत्रे नसलेल्या २७ वाहनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनांची कागदपत्रे आणि संबंधित बाबींची पडताळणी करण्यात येत आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कारवाई सुरूच राहणार

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळीच नियंत्रण मिळविणे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अशा प्रकारच्या अचानक व धडक तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू राहतील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

नशिराबाद पोलिसांच्या पहाटेच्या या धडक कारवाईचे परिसरातून स्वागत होत असून, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची वाढती सक्रियता चर्चेचा विषय ठरत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version