Spread the love

माळेगाव पिंपरीतील जि.प. शाळेच्या इमारत बांधकामावर अनियमिततेचे आरोप

माहिती फलकाचा अभाव; निकृष्ट साहित्य वापरल्याचा ग्रामस्थांचा दावा, तांत्रिक चौकशीची मागणी

सोयगाव : प्रतिनिधी शिवराम दगडू जाधव

सोयगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव पिंपरी अंतर्गत मौजे पिंपरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, या बांधकामात अनियमितता होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला असून, कामाची तातडीने तांत्रिक पाहणी करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष स्थळ पाहणीदरम्यान बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलक लावण्यात आलेला नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ६ ऑगस्ट २०१४ रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय बांधकामाच्या ठिकाणी संबंधित कामाची माहिती देणारा फलक लावणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप

बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून, मंजूर अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेटनुसार) काम केले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात उपसरपंचांनी ठेकेदाराकडे कामाचे इस्टिमेट मागितले असून, माहिती फलक लावेपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ठेकेदाराच्या कामकाजाला सरपंच व ग्रामसेवक यांचे समर्थन असल्याची चर्चा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.

आठ दिवसांत कार्यवाहीची मागणी

या प्रकरणी दैनिक जन सम्राट टाईम्सचे प्रतिनिधी शिवराम जाधव यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सोयगाव यांच्याकडे लेखी निवेदन साद केले आहे. सदर बांधकामाची तातडीने तांत्रिक पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच आठ दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात प्रशासनाच्या तांत्रिक तपासणीनंतरच बांधकामातील अनियमितता किंवा साहित्याच्या दर्जाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version