Spread the love

MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात जळगावात विद्यार्थ्यांचा एल्गार

९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; विविध मागण्यांसाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव : ग्रामीण प्रतिनिधी शैलेश गुरव

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांबाबत विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ९ सप्टेंबर २०२६ रोजी जळगावात विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता जी.एस. ग्राउंड येथून आंदोलनाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे. या आंदोलनात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पोस्टरवर “आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!” असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. MPSC परीक्षांमध्ये पारदर्शकता राखणे, कथित गैरप्रकारांची चौकशी करणे तसेच परीक्षा प्रक्रियेतील विविध बाबींची सखोल तपासणी करणे, या प्रमुख मागण्या आंदोलनातून मांडण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

  • MPSC चे अध्यक्ष व सचिव यांनी राजीनामा देऊन त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी.
  • गट-ब परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत तातडीने स्पष्टीकरण देऊन त्याची चौकशी करावी.
  • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ आणि कृषीसेवा परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर तपासणीतील कथित त्रुटींची चौकशी करावी. मुंबई क्राईम ब्रँचकडून MPSC ला देण्यात आलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा.
  • अटक करण्यात आलेल्या आरोपींशी संबंधित सचिव लांडगे यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे.
  • आरोपी लांडगे, मराठे आणि नवथाने यांच्या सेवाकाळाची तसेच पदोन्नतीच्या निकषांची सखोल चौकशी करावी.
  • संशयित संपर्कातून निवड झाल्याचा आरोप असलेल्या उमेदवारांचे CDR तपासण्यात यावेत.
  • प्रविण पाटील व मधुर ठाकरे यांच्यासह इतर कथित एजंट्सच्या सहभागाची सखोल चौकशी करावी.
  • इतर परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांची दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी.
  • ‘D’ मधील संशयास्पद निकाल तसेच उन्नती विद्यार्थ्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे.
  • २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क पूर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी.
  • लघुलेखक (Stenographer) पद पुन्हा नियमित करण्यात यावे.

विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या या मागण्यांवर शासन आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे आता विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. आंदोलनाच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्याची मागणी करण्यात येणार आहे.

आंदोलनाची माहिती

दिनांक : ९ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी ९ वाजता
सुरुवात : जी.एस. ग्राउंड, जळगाव
समारोप/मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

Share.
Leave A Reply

Exit mobile version