Spread the love

हक्काच्या जागेवरून वडार समाज आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद

वडार समाजाचा जागा बळकावल्याचा आरोप; चेतन मंडोरे व दीपक खताळ यांनी कागदपत्रे दाखवत दावा फेटाळला

धुळे : प्रतिनिधी

धुळे शहरातील सुरत बायपास महामार्गावरील चक्करबर्डी परिसरालगत असलेल्या सिटी सर्वे क्रमांक १००३२ मधील गट क्रमांक ५१०/१-अ पैकी काही जागेवरून वडार समाज आणि व्यापारी चेतन मंडोरे व दीपक खताळ यांच्यात वाद निर्माण झाला आहे. हक्काच्या जागेवर बेकायदेशीर उत्खनन होत असल्याचा आरोप करत वडार समाजाने आक्रमक भूमिका घेत शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संबंधित जागेवर आंदोलन केले. दुसरीकडे मंडोरे व खताळ यांनी सदर जागेच्या मालकीसंदर्भातील कागदपत्रे दाखवत वडार समाजाचे आरोप फेटाळले आहेत.

वडार समाजाच्या म्हणण्यानुसार, शासनाने अनेक वर्षांपूर्वी समाजाला ही जागा दिली असून, या ठिकाणी समाजातील कुटुंबांचा पिढ्यान्‌पिढ्यांचा रहिवास आहे. १९८८ ची मोजणी शीट, भूमी अभिलेखाचा आलेख तसेच चौकशी नोंदवहीतील उतारे यामध्ये संबंधित नावे असल्याचा दावा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सदर जमीन नवीन अभिलेखातील सत्ताप्रकारात असल्याने तिची खरेदी-विक्री करता येत नसल्याचा दावा करत, संबंधित जागेवर बेकायदेशीररीत्या ताबा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वडार समाजाने केला आहे. या प्रकरणी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

खड्ड्यात उतरून आंदोलन; उपोषणाचा इशारा

आपल्या हक्काच्या जागेसाठी वडार समाज आक्रमक झाला असून, शेकडो नागरिकांनी संबंधित जागेवरील खड्ड्यात उतरून आंदोलन केले. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा वडार समाजाचे दीपक वेताळ यांनी दिला आहे.

मंडोरे, खताळ यांच्याकडून कागदपत्रे सादर

दरम्यान, या आरोपांबाबत चेतन मंडोरे व दीपक खताळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर जागेशी संबंधित खरेदीखत, जुने रेकॉर्ड, मोजणी शीट तसेच ७० वर्षांचे ‘ड’ पत्रक प्रसारमाध्यमांसमोर दाखवले. सरकारी शुल्क भरून सदर जागा कायदेशीररीत्या खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

चेतन मंडोरे यांनी सांगितले की, “वडार समाजाने आपले आरोप सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावीत. माझ्याकडील कागदपत्रे चुकीची असल्याचे सिद्ध झाल्यास मी माफी मागण्यास तयार असून समाजाला आवश्यक ती मदतही करेन. मात्र, चुकीची माहिती प्रसारित करून बदनामी केल्यास संबंधितांविरोधात ५० लाख रुपयांचा मानहानीचा दावा तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर भूमिका घेतली जाईल.”

दोन्ही गटांकडून पोलिसांत तक्रार

सदर जागेवरून दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याची माहिती असून, या घटनेप्रकरणी दोन्ही बाजूंनी शहर पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

या जागेच्या मालकी व हक्काबाबत दोन्ही पक्षांनी प्रशासनाकडे आपापली कागदपत्रे सादर केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्रकरण प्रशासनाच्या विचाराधीन असून, संबंधित कागदपत्रांची तपासणी व कायदेशीर बाबींच्या आधारे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणातील जागेची मालकी, हक्क व वापर याबाबतची अंतिम वस्तुस्थिती अधिकृत प्रशासकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version