Spread the love

पावसाची दांडी; भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

खरीप पिके सुकण्याच्या मार्गावर; कापूस लागवडीत २,७४४ हेक्टरची घट, आठ महिन्यांत जिल्ह्यात ९९ शेतकरी आत्महत्यांची नोंद

भुसावळ | प्रतिनिधी संघरत्न सपकाळे : खरीप हंगामाला सुरुवात होऊन पिकांची उगवण झालेली असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे मध्यम व काळपट जमिनीतील पिकांनी तग धरला असला, तरी आता पावसाने आणखी ओढ दिल्यास खरीप पिकांवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणारा शेतकरी पुन्हा संकटाच्या छायेत आला आहे. उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याच्या समस्यांमध्ये आता पावसाचे संकटही भर पडली आहे.

कापूस लागवडीत २,७४४ हेक्टरची घट

भुसावळ तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामावर हवामानातील बदलाचा परिणाम जाणवत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तालुक्यात कापूस लागवडीच्या क्षेत्रात तब्बल २,७४४ हेक्टरची घट झाल्याचे समोर आले आहे.

ऑगस्ट तसेच सप्टेंबरच्या सुरुवातीला अनेक भागांत पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने कापूस, मका, मूग आणि उडीद यांसारखी महत्त्वाची खरीप पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

पावसाबरोबरच आत्महत्यांचे संकटही कायम

एकीकडे पावसाअभावी पिकांची चिंता वाढली असताना दुसरीकडे शेतकऱ्यांकडून जीवन संपवण्याचे सत्रही थांबलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जळगाव जिल्ह्यात ९९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

यापैकी ४७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र, तर २२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. तब्बल ३० प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि मानसिक अडचणींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा

पावसाने आणखी ओढ दिल्यास खरीप पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा प्रशासनाने तातडीने आढावा घेणे गरजेचे आहे.

पावसाची प्रतीक्षा, हातात आलेल्या पिकांची चिंता आणि डोक्यावरचे कर्ज अशा तिहेरी संकटात भुसावळ तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version