‘आपले सरकार सेवा केंद्र’ वाटपात राजकीय व आर्थिक वशिला टाळा; कामगार सेनेची प्रशासनाकडे मागणी
१,०५३ जागांसाठी निवड प्रक्रिया; मुलाखतींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व गुणांसह अंतिम गुणवत्तायादी जाहीर करण्याची कामगार सेनेची मागणी
नशिराबाद | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ वाटपाची निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधिष्ठित आणि कोणत्याही राजकीय अथवा आर्थिक वशिल्यापासून मुक्त ठेवण्यात यावी, अशी जोरदार मागणी जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.
यासंदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीपकुमार साळी आणि सामाजिक कार्यकर्ते कपिल पानपाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
१,०५३ जागांसाठी निवड प्रक्रिया
जळगाव जिल्ह्यातील ६८२ गावांमध्ये १,०५३ जागांवर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या निवड प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी, प्रत्यक्ष पाहणी, मुलाखत तसेच १०० गुणांच्या आधारे गुणवत्तायादी तयार करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे.
या पार्श्वभूमीवर निवड प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा राजकीय, आर्थिक किंवा स्थानिक दबाव येऊ नये, तसेच पात्र आणि गुणवत्ताधिष्ठित उमेदवारांना समान संधी मिळावी, याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुलाखतींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी
निवेदनात ५ व ६ ऑक्टोबर रोजी संबंधित तहसील कार्यालयांमध्ये होणाऱ्या मुलाखतींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवड प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेले निकष स्पष्ट आणि सर्व उमेदवारांना समानपणे लागू असावेत, याचीही दक्षता घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.
तसेच अंतिम निवडीनंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेले गुण, गुणवत्ताक्रम आणि अंतिम गुणवत्तायादी अधिकृत संकेतस्थळावर सार्वजनिक करण्यात यावी. प्राप्त झालेल्या हरकतींचे तातडीने, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निराकरण करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
सुशिक्षित बेरोजगारांच्या अपेक्षा प्रशासनाकडे
‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यास मदत होते. त्यामुळे या केंद्रांच्या वाटपात गुणवत्ता, पात्रता आणि पारदर्शकता यांना सर्वोच्च प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे कामगार सेनेने म्हटले आहे.
निवड प्रक्रियेतील पुढील टप्प्याकडे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे लक्ष लागले असून, प्रशासन या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
