Spread the love

एरंडोल शाळा- महाविद्यालय परिसरात अजून पोलिस पेट्रोलिंग कडक नियम वाढवा ; दामिनी पथकाचीही नियुक्ती करा

नगरसेवक रविंद्र संतोष महाजन यांची एरंडोल पोलिसांकडे मागणी

एरंडोल | प्रतिनिधी : शहरातील तसेच शहरालगतच्या शाळा, विद्यालये आणि महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस पेट्रोलिंग अधिक कडक व शिस्तबद्ध करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक रविंद्र संतोष महाजन यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एरंडोल पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन देऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये शाळा-महाविद्यालय भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या काळात काही समाजकंटकांकडून छेडछाड अथवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडील काही घटना स्थानिक पालकांच्या तसेच पोलिसांच्या निदर्शनास आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गर्दीच्या वेळेत नियमित पोलिस गस्त

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दुपारी ११ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत शाळा-महाविद्यालय परिसरात नियमित पोलिस पेट्रोलिंग करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पोलिस प्रशासनाकडून यापूर्वीही संबंधित परिसरात नियमित गस्त घालण्यात येत आहे. मात्र, विद्यार्थिनींची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी या गस्तीचे प्रमाण वाढवून अधिक प्रभावी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे नगरसेवक महाजन यांनी म्हटले आहे.

गणवेश व ओळखपत्राची सक्ती करण्याची मागणी

शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गणवेश आणि ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांनीही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

‘दामिनी’ पथकाची नियमित गस्त सुरू करा

विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एरंडोल शहरात दामिनी पथकाची नियमित गस्त सुरू करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शैक्षणिक परिसरात महिला पोलिसांची उपस्थिती वाढल्यास विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिस प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी नगरसेवक रविंद्र संतोष महाजन यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version