म्हैसवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला विकासाची ‘नवी कमान’!
लोकसहभागातून साकारतेय आकर्षक प्रवेशद्वार; गुणवत्तावाढीमुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे वाढता ओढा
मलकापूर प्रतिनिधी : म्हैसवाडी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या विकासाला लोकसहभागाची भक्कम साथ मिळत असून, शाळेच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच विनोद जगन्नाथ चौधरी यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या आकर्षक कमान व मुख्य प्रवेशद्वाराचे भूमिपूजन सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. श्रीफळ वाहून श्री. चौधरी यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले.
या सोहळ्यास बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सोपानराव शेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मुख्याध्यापक सुरेश सैंदाणे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा, शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विविध उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.
गुणवत्तावाढीने पालकांचा विश्वास वाढला!
मुख्याध्यापक सुरेश सैंदाणे यांच्या नेतृत्वाखाली शाळेत विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक तसेच सहशालेय उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दिसून येत आहे. शाळेचा वाढता शैक्षणिक दर्जा आणि उपक्रमशील वातावरण यामुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे विश्वास वाढला असून, विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतही सातत्याने वाढ होत आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि लोकसहभाग यांचा सुरेख संगम साधल्यास ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होऊ शकतो, याचे म्हैसवाडी शाळा हे सकारात्मक उदाहरण ठरत आहे. शाळेच्या नवीन प्रवेशद्वारामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच ग्रामस्थांची शाळेविषयीची आत्मीयता आणि बांधिलकीही अधोरेखित होणार आहे.
माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा पुढाकार कौतुकास्पद
शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील शाळांचा विकास केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता लोकसहभागातूनही प्रभावीपणे करता येतो, असा संदेश या उपक्रमातून मिळत आहे.
भूमिपूजन सोहळ्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर दिनकर धाडे, उपाध्यक्ष उल्हास निना लोखंडे, सदस्य विनोद साहेबराव लोणे, शिवाजी विलास धाडे, विष्णू भगवान लोणे, अशोक भागवत धाडे, दुर्गेश कैलास धाडे, ज्योती राजू शिरसाठ, ज्योती मंगेश कांडेलकर, प्रतीक्षा राकेश ताटे, राजश्री संजय चौधरी यांच्यासह सौ. सारिका खडसे, सौ. दुर्गा लोणे, सौ. रूपाली पाचपांडे, सौ. वंदना नाले, सौ. मनीषा शेलकर, सौ. कल्पना धाडे, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. सुनिता सैंदाणे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
