Spread the love

शेलवडच्या जि.प. प्राथमिक केंद्र शाळेत ‘अक्षरहंडी’ उपक्रम उत्साहात

खेळातून शिक्षणाचा आनंद; अक्षरओळख, शब्दनिर्मिती व वाचन कौशल्याला मिळाली चालना

शेलवड, ता. बोदवड : विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य विकसित होण्यासोबतच अक्षरओळख, शब्दनिर्मिती आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने जि. प. प्राथमिक केंद्र शाळा शेलवड येथे ‘अक्षरहंडी’ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हंडीमध्ये ठेवलेल्या विविध अक्षरांच्या चिठ्ठ्या निवडून त्यापासून नवीन शब्द तयार केले. तयार केलेल्या शब्दांचे वाचन करून त्यांचा वाक्यात उपयोग करण्याची कृतीही विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अक्षर, शब्द आणि वाक्यरचनेचा सराव आनंददायी पद्धतीने करता आला.

खेळातून शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

अक्षरहंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, शब्दनिर्मिती, आकलन आणि कल्पनाशक्तीला चालना मिळाली. पारंपरिक पद्धतीपेक्षा खेळ व कृतीच्या माध्यमातून शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अक्षरांशी खेळता-खेळता शब्दांची निर्मिती आणि त्यांचा योग्य वापर करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढली असून, ‘खेळातून शिक्षण’ ही संकल्पना प्रभावीपणे रुजविण्यास मदत झाली.

शिक्षकांच्या मार्गदर्शनातून अभिनव उपक्रम

कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री. दिलीप जवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक श्री. सुनील माळी, पद्माकर गोसावी, श्रीमती शुभांगी शिंगटे, श्री. विनोद चव्हाण, श्रीमती रेखा चवरे, श्रीमती मिनाक्षी बुर्रेवार, श्रीमती सुप्रिया फुंदे, सौ. सुरेखा कव्हळे, सौ. रेणुका सुरळकर तसेच शंकरगिरी महाराज यांनी केले.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत अक्षरहंडी उपक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. शाळेत राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version