सोयगावात वीज तार तुटून पडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप; महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मेन सप्लायची तार तुटून रस्त्यावर; इंजिनिअरला फोन करूनही प्रतिसाद नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप; निकृष्ट डीपी कामाची चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी : शिवराम जाधव |
सोयगाव : गावातील मेन वीज सप्लाय सातारा डीपीवरून स्ट्रीट लाईटला जोडण्यात आलेली वीज तार मंगळवारी रात्री अचानक तुटून खाली पडल्याची घटना घडली. सुदैवाने यावेळी मोठी जीवितहानी टळली. मात्र, वीज तार तुटून पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महावितरणच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, घटना घडल्यानंतर संबंधित महावितरणच्या इंजिनिअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वीज तार रस्त्यावर किंवा रहदारीच्या ठिकाणी तुटून पडल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
‘जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?’
वीज वाहिनी तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असतील तर संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटनेत एखाद्या नागरिकाची जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित महावितरणचे अधिकारी, इंजिनिअर व लाईनमन यांच्यावर निश्चित करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, गावातील वीजभाराच्या दृष्टीने नवीन डीपी बसविण्यात आला आहे. मात्र, या डीपीचे काम ज्या ठेकेदारामार्फत करण्यात आले, ते काम अत्यंत निकृष्ट व बोगस पद्धतीने झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची तातडीने पाहणी करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निकृष्ट कामाची चौकशी करून पेमेंट रोखण्याची मागणी
नवीन डीपीच्या कामाची गुणवत्ता तपासून संबंधित ठेकेदाराला करण्यात आलेले पेमेंट थांबवावे आणि पेमेंट झाले असल्यास नियमानुसार त्याची वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्याच्या गायीचा शॉक लागून मृत्यू?
दरम्यान, वीजप्रवाहामुळे एका शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू झाल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या घटनेचीही संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
माळेगाव येथील अधिकाऱ्यांनी पाहणी करावी
या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित महावितरणच्या इंजिनिअरांनी तातडीने गावात येऊन घटनास्थळाची पाहणी करावी. वीजवाहिन्या, डीपी व जोडण्यांची तपासणी करून धोकादायक स्थितीतील व्यवस्था तात्काळ दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वीज यंत्रणेतील त्रुटी दूर करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य न दिल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
