Spread the love

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पाच दिवस आधीच ‘एसबीएमएमच्या राजा’चे आगमन; महापौरांच्या हस्ते मुखदर्शनाचे उद्घाटन

१६ फुटी भव्य गणरायाच्या आगमनाने आग्रा रोड परिसर दुमदुमला; ‘बाप्पा स्पर्धेसाठी नव्हे, श्रद्धेसाठी’ — मंडळाचे अध्यक्ष मिलिंद आवटे

धुळे : मुंबई-पुण्याच्या धर्तीवर आता धुळ्यातही मोठ्या गणरायाच्या मूर्तींचे गणेश चतुर्थीपूर्वीच आगमन होऊ लागले आहे. गणेशोत्सवाच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य म्हणून धुळ्यातील साईबाबा मुंज्या मारुती मंडळाच्या १६ फुटी गणरायाचा भव्य आगमन सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते गणरायाच्या मुखदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मंडळाचे अध्यक्ष मिलिंद आवटे यांनी, “आमचा बाप्पा कुठल्याही स्पर्धेसाठी नव्हे, तर श्रद्धेसाठी आहे,” अशी भावना व्यक्त केली. तर विकी परदेशी यांनी यंदा भरपूर पाऊस पडावा आणि सर्वांना निरोगी आरोग्य लाभावे, अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.

‘एसबीएमएमच्या राजा’चे आगमन

नंदुरबारहून आणली १६ फुटी भव्य मूर्ती

साईबाबा मुंज्या मारुती मंडळाचे यंदा नववे वर्ष असून, दरवर्षी आकर्षक आणि भव्य गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्याची मंडळाची परंपरा आहे. यंदा मंडळाने नंदुरबार येथून सिंहासनावर आरूढ असलेली तब्बल १६ फुटी गणरायाची भव्य मूर्ती आणली आहे.

गणरायाची लक्षवेधी मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

जयघोषाने आग्रा रोड परिसरात भक्तिमय वातावरण

जुन्या मनपा कार्यालयापासून गणरायाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि भक्तांचा उत्साह यामुळे आग्रा रोड परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेश चतुर्थीच्या पाच दिवस आधीच हा आगमन सोहळा आयोजित करण्यात आला. प्रशासनाला सहकार्य करण्याच्या मंडळाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.

जुन्या मनपापासून सुरू झालेली भव्य आगमन मिरवणूक शासकीय दूध डेअरी परिसरातील कोळवले नगर येथे उत्साहात संपन्न झाली.

मान्यवरांसह शेकडो गणेशभक्तांची उपस्थिती

या आगमन सोहळ्यास महापौर मायादेवी परदेशी, भाजपा पदाधिकारी तथा युवानेते विकी परदेशी, मंडळाचे अध्यक्ष मिलिंद आवटे, नगरसेविका चित्रलेखा परदेशीमहादेव परदेशी, संतोष परदेशी, राकेश पाटील यांच्यासह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात पार पडलेल्या या भव्य आगमन सोहळ्याने धुळ्यातील गणेशोत्सवाची उत्साही सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version