Spread the love

पिठोरी अमावस्येनिमित्त मातृवंदना; आईच्या त्याग, ममतेला आणि संस्कारांना भावपूर्ण अभिवादन

‘मातृदेवो भव’च्या भावनेतून मातृत्वाचा गौरव; आईच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होण्याचा संदेश

जळगाव ग्रामीण – प्रतिनिधी शैलेश गुरव : आज पिठोरी अमावस्या. भारतीय संस्कृतीत मातेला अनन्यसाधारण महत्त्व असून, ‘मातृदेवो भव’ या भावनेतून आईला देवतास्वरूप मानले जाते. मातृत्व, माया, त्याग आणि वात्सल्याची आठवण करून देणारा हा पवित्र दिवस आईच्या निःस्वार्थ प्रेमाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो.

आई म्हणजे प्रेम, माया, त्याग आणि संस्कारांचे मूर्तिमंत रूप. मुलांच्या सुखात स्वतःचे सुख मानणारी, संकटाच्या काळात खंबीरपणे साथ देणारी आणि पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर झटणारी आई ही प्रत्येकाच्या जीवनातील पहिली गुरु असते. जन्म देण्यापासून ते जीवनाला योग्य दिशा देण्यापर्यंत आईची भूमिका अतुलनीय आहे.

वीरमातांच्या संस्कारांनी घडला इतिहास

भारतीय संस्कृती आणि इतिहासात अनेक मातांनी आपल्या संस्कारांनी आणि कर्तृत्वाने इतिहास घडविला. वीरमाता जिजाबाई आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या मातांनी आपल्या कर्तृत्वाने मातृत्वाची ताकद जगासमोर अधोरेखित केली. देवकी असो वा यशोदा, आईच्या मायेचे, वात्सल्याचे आणि त्यागाचे स्वरूप सदैव पवित्रच राहिले आहे.

पाल्यांच्या दीर्घायुष्यासाठी मातांची श्रद्धा

पिठोरी अमावस्येनिमित्त अनेक ठिकाणी माता आपल्या पाल्यांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत-उपवास करतात. पाल्यांचे औक्षण केले जाते. तसेच पिठाचे दिवे प्रज्वलित करून चौसष्ट योगिनींची पूजा करण्याची परंपराही आहे.

या धार्मिक परंपरांमागे आई आणि मुलांमधील प्रेम, जिव्हाळा आणि अतूट नाते अधिक दृढ करण्याची भावना आहे. आपल्या पाल्यांच्या सुख-समृद्धीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी आई श्रद्धेने प्रार्थना करते.

आईचे उपकार फेडणे अशक्य

आईचे उपकार एका जन्मात फेडणे अशक्य आहे. तिचे निःस्वार्थ प्रेम ही जगातील सर्वात अनमोल संपत्ती आहे. त्यामुळे पिठोरी अमावस्येच्या या पवित्र दिनानिमित्त घरोघरी परमेश्वरी रूपात वावरणाऱ्या सर्व मातांना मनःपूर्वक वंदन आणि साष्टांग दंडवत.

“गोड तुझ्या त्या स्वप्नामधली,
दाखव मजला तुझी माऊली…”

आईच्या मायेची, त्यागाची आणि वात्सल्याची आठवण करून देणाऱ्या या भावपूर्ण दिवसानिमित्त प्रत्येकाने आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि तिच्या चरणी नतमस्तक व्हावे, हाच पिठोरी अमावस्येचा खरा संदेश आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version