Spread the love

नशिराबादमध्ये पोळ्यानिमित्त बैलांच्या शर्यतीचा थरार रंगला; सजावट स्पर्धेलाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बैलजोडी सजावट स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद; किशोर पाटील यांच्या बैलजोडीने पटकावला प्रथम क्रमांक

नशिराबाद : महाराष्ट्राचा पारंपरिक आणि शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा सण असलेल्या पोळ्यानिमित्त नशिराबाद येथे वर्षानुवर्षे जपली जाणारी बैलांच्या शर्यतीची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि दणक्यात पार पडली. रोमांचक झालेल्या या शर्यतीत परिसरातील तब्बल ५० बैलजोड्यांनी सहभाग नोंदवला.

सकाळी ठीक ११.३० वाजता दिगंबर जीवराम रोटे यांनी बंदुकीचा बार उडवून शर्यतीचा अधिकृत शुभारंभ केला. बार उडताच बैलजोड्यांनी गावाच्या मुख्य द्वाराच्या दिशेने घेतलेले दमदार प्रस्थान आणि उपस्थित शौकिनांचा जल्लोष यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले.

अतिशय चुरशीच्या झालेल्या शर्यतीत दीपक भालचंद्र बोंडे आणि विपुल बाळकृष्ण नारखेडे यांच्या बैलजोड्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी तसेच आपल्या लाडक्या बैलांचे बळ आणि वेग पाहण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

बैलजोडी सजावट स्पर्धेत किशोर पाटील अव्वल

बैलांच्या शर्यतीसोबतच नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेलाही शेतकरी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास ४० बैलजोड्या पारंपरिक आणि आकर्षक सजावटीसह सहभागी झाल्या होत्या.

या स्पर्धेचे परीक्षण पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास इंगळे आणि राधिका इंगळे यांनी केले. त्यांना प्रा. डॉ. विश्वनाथ महाजन आणि प्रा. प्रवीण महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सजावट स्पर्धेतील विजेते

  • 🥇 प्रथम क्रमांक : किशोर मधुकर पाटील — ७,१०० रुपये रोख व चषक
  • 🥈 द्वितीय क्रमांक : सोपान कौतिक पाचपांडे — ५,१०० रुपये रोख व चषक
  • 🥉 तृतीय क्रमांक : सतीश पंडित कावळे — ३,१०० रुपये रोख व चषक

याशिवाय लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील आणि धनश्री ॲग्रोचे मालक चंदू दादा भोळे यांच्या वतीने विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. नशिराबाद पेठ येथील लोकेश पाटील आणि हर्षल पाटील यांच्या बैलजोडीने हे प्रोत्साहनपर बक्षीस पटकावले.

सहभागी सर्वच बैलजोड्यांच्या आकर्षक आणि पारंपरिक सजावटीने उपस्थितांची मने जिंकली.

प्रशासनासह पोलिसांचे प्रभावी नियोजन

हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन, सभापती कीर्तीकांत चौबे, विनोद रंधे, किरण पाटील, विकास धनगर, चेतन बऱ्हाटे, सचिन महाजन, पराग नारखेडे आणि दिगंबर जीवराम रोटे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, विविध सोसायट्यांचे चेअरमन तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शर्यतीचा थरार पाहण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी नशिराबादच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे आणि नशिराबाद पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पोळ्याच्या निमित्ताने बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच पारंपरिक शर्यत आणि सजावट स्पर्धेच्या माध्यमातून नशिराबादकरांनी आपल्या सांस्कृतिक परंपरेचा गोडवा आणि उत्साह कायम ठेवला. संपूर्ण सोहळ्यात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शेतकरी बांधवांचा आनंद ओसंडून वाहत होता.

Share.
Leave A Reply

Exit mobile version