Spread the love

डोंगराळे गावातील व्यायामशाळा धूळखात; तरुणांची दुरुस्ती व साहित्याची मागणी

छत गळते, भिंतींना तडे; पोलीस-लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची गैरसोय, निधी मंजूर करण्याची मागणी

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील व्यायामशाळांची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या व्यायामशाळा अक्षरशः धूळखात पडल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुण आणि उदयोन्मुख खेळाडूंसाठी महत्त्वाच्या असलेल्या या सुविधांकडे तातडीने लक्ष देऊन व्यायामशाळांची दुरुस्ती करावी तसेच आवश्यक व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिक क्रीडाप्रेमींनी केली आहे.

समाधान सोनवणे, संतोष ठाकरे, भरत गायकवाड, विजय भोई, गणेश चिते आणि आशिष परदेशी यांनी याबाबत क्रीडा व युवक कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन तसेच स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली आहे.

छत गळते, भिंतींना तडे

दुरुस्तीअभावी व्यायामशाळांच्या इमारतींची अवस्था बिकट झाली आहे. छत गळत असून भिंतींना तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी आवश्यक व्यायाम साहित्य उपलब्ध नसल्याने तरुणांना सरावासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डोंगराळे परिसरातील अनेक तरुण पोलीस भरती, लष्कर भरती तसेच विविध क्रीडा स्पर्धांची तयारी करीत आहेत. मात्र व्यायामशाळांची दुरवस्था आणि सुविधांचा अभाव असल्याने त्यांना उघड्यावर किंवा इतर ठिकाणी जाऊन सराव करावा लागत आहे.

शासनाच्या विविध योजनांतून निधी उपलब्ध होण्याची शक्यता

ग्रामीण भागातील क्रीडा सुविधांचा विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा आधार घेऊन या व्यायामशाळांचा कायापालट करता येऊ शकतो. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विकास निधीसह जिल्हा वार्षिक योजनेतील क्रीडा निधी आणि ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून क्रीडा सुविधांसाठी तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

व्यायामशाळांची दुरुस्ती करून आधुनिक साहित्य उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील तरुणांना नियमित सरावासाठी मोठी सुविधा मिळणार आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रात नव्या प्रतिभांना संधी मिळण्यासोबतच पोलीस आणि लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.

‘तातडीने निधी द्या, अन्यथा आंदोलन’

डोंगराळे गावातील व्यायामशाळांच्या दुरवस्थेकडे क्रीडा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील तरुणांनी केली आहे. व्यायामशाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून आवश्यक व्यायाम साहित्य उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे.

ग्रामीण भागातील युवकांच्या आरोग्य आणि भवितव्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version