लंडनच्या संसदेत होणार भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवाचा जागर
बोधिसत्व फाऊंडेशन मुंबई आणि बीबीएमजी फाऊंडेशन लंडनचा संयुक्त उपक्रम; आंतरराष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर नाट्यमय सादरीकरण
मुंबई, दि. १० : भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधानाच्या अमृतमहोत्सवाचा जागर आता भारताबाहेर लंडनच्या संसदेत होणार आहे. बोधिसत्व फाऊंडेशन मुंबई, भारत आणि बीबीएमजी फाऊंडेशन, लंडन, यूके यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची माहिती बोधिसत्व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे आणि बीबीएमजी फाऊंडेशन, लंडनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव हंस यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भारतासह विविध देशांतील मान्यवरांची उपस्थिती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या भारतीय संविधानाला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमास भारत, जपान, कंबोडिया, थायलंड, लंडन, श्रीलंका, फ्रान्स आणि दक्षिण कोरिया येथील मंत्री, खासदार, राजदूत, उद्योगपती तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
भारतामधूनही विविध केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्री, खासदार आणि मान्यवरांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर विशेष नाट्यमय सादरीकरण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, सामाजिक आंदोलन, विचार, वारसा, दूरदृष्टी आणि ग्रंथसंपदा यांना समर्पित विशेष आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत लंडन आणि लीसेस्टर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विशेष ‘थिएट्रिकल सादरीकरण’ करण्यात येणार आहे. आंबेडकरांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा जागतिक पातळीवर प्रसार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
लंडनच्या संसदेत ‘इंडो-यूके फ्री ट्रेड समिट’
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून लंडन येथील संसदेत ‘इंडो-यूके फ्री ट्रेड समिट – Chapter 10’ चे आयोजन करण्यात आले आहे.
भारत आणि यूकेमधील द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि व्यावसायिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भारत व यूकेमधील प्रमुख उद्योगपती, उद्योजक आणि संबंधित क्षेत्रातील मान्यवर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
सामाजिक समानता आणि आर्थिक सहकार्यावर भर
सामाजिक समानता, सांस्कृतिक देवाणघेवाण, आर्थिक सहकार्य तसेच भारत-यूके संबंध अधिक दृढ करणे ही या आंतरराष्ट्रीय उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे आयोजकांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासोबतच भारत आणि इतर देशांमधील सामाजिक व आर्थिक संबंधांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.
विविध देशांतील मान्यवरांना निमंत्रण
या कार्यक्रमासाठी भारतासह विविध देशांतील अनेक मान्यवरांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये भारतातून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांचा समावेश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
लंडन येथून माजी पंतप्रधान ऋषी सुनक, खासदार वीरेंद्र शर्मा, खासदार रामी रेंजर, माजी महापौर सुनील चोप्रा, होली ग्रुपचे चेअरमन विजय गांधी, खासदार बॉब ब्लॅकमॅन, खासदार गॅरेथ थॉमस तसेच विविध क्षेत्रांतील उद्योगपती आणि मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच थायलंडचे माजी पंतप्रधान प्रवित वोन्सुवोन, सौरक्षण मंत्री आडूल बून्थम्चरोएन आणि श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यासह विविध देशांतील मान्यवरांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
संविधानाच्या विचारांचा जागतिक जागर
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लंडनच्या संसदेत होणारा हा कार्यक्रम भारतीय संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा जागतिक पातळीवर जागर घडविणारा उपक्रम ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
“भारतीय संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जगभर पोहोचविणे, तसेच भारत-यूके संबंधांना सामाजिक आणि आर्थिक सहकार्याची नवी दिशा देणे,” हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे डॉ. गौरव हंस आणि अविनाश कांबळे यांनी सांगितले.
