Spread the love

पोळ्याच्या दिवशी पळासखेडे बु. येथे तरुणाचा खून; किरकोळ वादातून चाकूने हल्ला

शेताजवळ मागील भांडणातून वाद; १८ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : पोळ्याच्या दिवशीच पारोळा तालुक्यातील पळासखेडे बु. येथे किरकोळ वादातून १८ वर्षीय विद्यार्थ्याचा चाकूने हल्ला करून खून झाल्याची घटना घडली. मयुर दुर्वास पाटील (वय १८) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी अंकुश नेहरू पाटील, रा. पळासखेडे बु. याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास पळासखेडे बु. शिवारातील रविंद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ घडली. मागील भांडणाच्या कारणावरून मयुर पाटील आणि आरोपी अंकुश पाटील यांच्यात वाद झाला.

समजावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हल्ला

फिर्यादी बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मयुर हा आपल्या चुलत भावासोबत शेताकडून गावाकडे येत होता. यावेळी त्याचा अंकुश पाटील याच्यासोबत वाद झाला. भांडण सुरू असल्याचे पाहून गावातील काही नागरिकांसह फिर्यादीने दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आरोपीने पँटच्या खिशातून चाकू काढून मयुरच्या पोटात वार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. हल्ल्यानंतर मयुर गंभीर जखमी झाला. आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

रुग्णालयात नेले; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले

गंभीर जखमी झालेल्या मयुरला ग्रामस्थांनी मोटारसायकलवरून कुटीर रुग्णालय, पारोळा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

मयुर पाटील हा किसान कॉलेजमध्ये एफ.वाय.बी.ए.चे शिक्षण घेत होता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केली आहे.

पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत. गुन्ह्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, प्रथम खबर न्यायालयाकडे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

आरोपीच्या अटकेच्या मागणीवर नातेवाईक ठाम

दरम्यान, जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मयुरच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई कधी आणि कशी केली जाते, याकडे पळासखेडे बु. ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

या घटनेमुळे पोळ्याच्या उत्सवी वातावरणावर शोककळा पसरली असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version