Spread the love

‘कम्युनिटी ॲक्शन अवॉर्ड’साठी प्रशांत बावस्कार यांची निवड

३० देशांतील ८६५ प्रस्तावांवर मात; मासिक पाळी स्वच्छता व महिला आरोग्य क्षेत्रातील कार्याची जागतिक दखल

भुसावळ | संघरत्न सपकाळे :
मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते प्रशांत निताबाई पांडुरंग बावस्कार यांच्या सामाजिक कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली असून, अमेरिकेतील नामांकित ॲस्पायर इन्स्टिट्यूटतर्फे त्यांची प्रतिष्ठित **‘कम्युनिटी ॲक्शन अवॉर्ड’**साठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील मासिक पाळी स्वच्छता, महिला आरोग्य आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या प्रभावी उपक्रमांचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात येणार आहे.

या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी जगभरातील ३० पेक्षा अधिक देशांतून तब्बल ८६५ प्रकल्प प्रस्ताव सादर करण्यात आले होते. विविध मूल्यांकन फेऱ्या, तज्ज्ञांचे परीक्षण तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सादरीकरणानंतर प्रशांत बावस्कार यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची अंतिम निवड करण्यात आली.

ग्रामीण भागात प्रत्यक्ष समुदायासोबत काम करत संवेदनशील विषयांवर शाश्वत बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मिळालेली ही जागतिक पावती मानली जात आहे. या पुरस्कारामुळे ग्रामीण भागातील सामाजिक उपक्रमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास बावस्कार यांनी व्यक्त केला.

ॲस्पायर इन्स्टिट्यूट ही अमेरिकास्थित जागतिक संस्था असून, वंचित आणि विविध सामाजिक पार्श्वभूमीतून येणाऱ्या गुणवंत तरुणांना नेतृत्व विकास, मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देण्याचे काम करते. प्रशांत बावस्कार हे संस्थेच्या ‘ॲस्पायर लीडर्स प्रोग्राम’चे माजी विद्यार्थी (Alumni) आहेत.

विविध राज्यांत सामाजिक विकासाचे कार्य

प्रशांत बावस्कार यांनी देशातील विविध राज्यांमध्ये सामाजिक विकासाच्या क्षेत्रात काम केले आहे. महिला आरोग्य आणि मासिक पाळी व्यवस्थापनासोबतच नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत झारखंडमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. तसेच केंद्र सरकारच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अभियानांतर्गत गुजरात आणि पंजाबमध्ये शिक्षण विकासासाठीही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कारानंतर आता जागतिक सन्मान

ग्रामीण भागात मासिक पाळी आणि महिला आरोग्याविषयी सातत्यपूर्ण जनजागृती व प्रत्यक्ष कार्य केल्याबद्दल प्रशांत बावस्कार यांना नुकतेच नवी दिल्ली येथील ‘वी द पीपल अभियान’ या संस्थेचा ‘संविधान साथी’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राष्ट्रीय सन्मानानंतर आता मिळालेल्या जागतिक पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला आणखी व्यापक ओळख मिळाली आहे.

प्रशांत बावस्कार हे ग्रामीण विकास अध्ययन केंद्र व समाजकार्य संशोधन संस्था, अहिल्यानगरचे माजी विद्यार्थी असून त्यांनी पिरामल फाऊंडेशनची गांधी फेलोशिपदेखील पूर्ण केली आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल बेलाड परिसरासह सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version