आमदार-खासदारांनंतर आता नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या वाहनांवर ‘लोगो’ थाट
वाहनांवर पदनाम व ओळखचिन्ह लावण्याचा नवा ट्रेंड; नियम सर्वांसाठी समान आहेत का? प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
मलकापूर प्रतिनिधी – शहरात वाहनांवर पदनाम, लोगो अथवा विशेष ओळखचिन्ह लावण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी आमदार, विधानपरिषद सदस्य तसेच खासदार यांच्या वाहनांवर पदाशी संबंधित लोगो अथवा ओळखचिन्ह लावल्याची चर्चा होती. आता नगरसेवकांच्या नावाचा अथवा पदाचा लोगो त्यांच्या नातेवाईकांच्या वाहनांवर झळकत असल्याचे दिसून येत असल्याने शहरात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
वाहनांवर अशा प्रकारचे पदनाम, लोगो किंवा विशेष ओळखचिन्ह लावण्यास नेमकी कोणती परवानगी आहे, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित वाहनधारकांना अशा प्रकारचा लोगो वापरण्याची अधिकृत परवानगी आहे का? असल्यास त्यासाठीचे नियम व निकष कोणते आहेत? आणि परवानगी नसल्यास संबंधित यंत्रणा याबाबत कोणती कारवाई करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पद कोणतेही असो, नियम मात्र सर्वांसाठी समान हवेत
लोकप्रतिनिधी असो अथवा सामान्य नागरिक, वाहनांवर नियमबाह्य चिन्हांचा वापर होत असल्यास संबंधित यंत्रणेने त्याची तपासणी करून नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. सामान्य वाहनधारकांवर नियमांची अंमलबजावणी केली जात असेल, तर पदाधिकारी किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या वाहनांबाबतही तेच निकष लागू झाले पाहिजेत, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
विशेषतः एखाद्या लोकप्रतिनिधीच्या पदाचा किंवा नावाचा लोगो त्यांच्या नातेवाईकांच्या खासगी वाहनावर वापरला जात असल्यास, त्यामागे अधिकृत परवानगी आहे की केवळ पदाचा प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न, याची स्पष्टता होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे मलकापूर शहरात चर्चेत आलेल्या या वाहनांवरील ‘लोगो’ प्रकरणाची संबंधित प्रशासन दखल घेणार का? संबंधित वाहनांची तपासणी करून लोगो वापरण्यामागे अधिकृत परवानगी आहे की नाही, हे स्पष्ट केले जाणार का? नियमांचा भंग आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
