साकत येथे कै. अयोध्या सुखदेव पुलवळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ‘अमृततुल्य कीर्तन’ संपन्न
अहिल्यानगर प्रतिनिधी – बापुसाहेब घोडेस्वार
जामखेड – कै. अयोध्या सुखदेव पुलवळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी साकत (ता. जामखेड) येथे भावपूर्ण वातावरणात पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांच्या अमृततुल्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनाला साकत ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांचे कीर्तन संपन्न झाले. आपल्या कीर्तनातून महाराजांनी कै. अयोध्या पुलवळे यांच्या साध्या, संस्कारशील आणि सेवाभावी जीवनप्रवासावर प्रकाश टाकला.
कै. अयोध्या पुलवळे यांनी गवळणी आणि भजनाच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर संस्कारांची अमूल्य शिदोरी दिली. त्यांचे साधेपण, सेवाभाव आणि माणुसकीची शिकवण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांनी काढले.
मान्यवरांची उपस्थिती; भावपूर्ण श्रद्धांजली
कै. अयोध्या पुलवळे यांना संपूर्ण साकत पंचक्रोशीत विशेष मान-सन्मान प्राप्त होता. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नसली, तरी त्यांनी दिलेले संस्कार, प्रेम आणि माणुसकीची शिकवण सदैव स्मरणात राहील, अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक आणि आप्तेष्टांनी एकत्र येत कै. अयोध्या पुलवळे यांच्या पवित्र आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, यासाठी सामूहिक प्रार्थनाही करण्यात आली.
या पुण्यस्मरण कार्यक्रमास जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, दिनकर मुरुमकर, रामभाऊ मुरुमकर यांच्यासह पुलवळे कुटुंबीय, नातेवाईक तसेच साकत पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कै. अयोध्या पुलवळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
