Spread the love

“ग्रंथालय हे पुस्तकांची पेढी नसून ज्ञानमंदिर” — आमदार ॲड. अमोलदादा पाटील

टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या नूतन ग्रंथालयाचे उद्घाटन; जळगाव जिल्ह्यातील योग शिक्षकांचा सन्मान

पारोळा / सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या नूतन ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच जळगाव जिल्ह्यातील योग शिक्षकांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दोन्ही कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ॲड. अमोलदादा पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नूतन ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या योग शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार ॲड. अमोलदादा पाटील म्हणाले, “ग्रंथालय हे केवळ पुस्तकांनी भरलेली जागा नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे आणि त्यांच्या विचारांना व्यापक करणारे ज्ञानमंदिर आहे.” आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी पुस्तक वाचनातून मिळणारी एकाग्रता, चिंतनशीलता आणि सखोल ज्ञान याला पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घेत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

योग शिक्षकांच्या कार्याचा गौरव

योग शिक्षकांच्या सत्कारप्रसंगी आमदार पाटील यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “शिक्षणासोबत उत्तम आरोग्य आणि संस्कार हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून शरीर, मन आणि विचार यांच्यात समतोल साधणारी जीवनपद्धती आहे.”

समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग पोहोचविण्यासाठी योग शिक्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे म्हणजे निरोगी समाजाच्या निर्मितीत त्यांच्या योगदानाचा गौरव करणे होय, असेही त्यांनी सांगितले.

‘ज्ञानवान पिढी आणि निरोगी समाज’ हीच विकासाची दिशा

‘ज्ञानवान पिढी आणि निरोगी समाज’ हीच आपल्या विकासाची खरी दिशा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच वाचन, योग, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा स्वीकार करावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

पारोळ्यातील शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये साकारण्यात आलेले हे नूतन ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन खुले करेल. त्याचप्रमाणे योग शिक्षकांचा करण्यात आलेला सन्मान त्यांच्या कार्याला निश्चितच नवी ऊर्जा देईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीनभाऊ सोनार, माजी उपनगराध्यक्ष सुदामबापू चौधरी, दीपकभाऊ अनुष्ठान, नगरसेवक भूषणभाऊ टिपरे, टायगर इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक रविंद्र पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version