Spread the love

महात्मा फुले हायस्कूलमध्ये डेंग्यू-मलेरियासह तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती

विद्यार्थ्यांना कीटकजन्य आजारांपासून बचाव, स्वच्छता आणि तंबाखूमुळे होणाऱ्या ‘मूक कॅन्सर’बाबत मार्गदर्शन

धरणगाव, प्रतिनिधी – प्रशांत शिंदे :
महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कीटकजन्य आजार व आरोग्य शिक्षणाबाबत डॉ. शुभम जाधव आणि MPW पी. एस. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना डेंग्यू, मलेरिया व हत्तीरोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या आजारांची प्रमुख लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घर व परिसरात पाणी साचू न देणे, नियमित स्वच्छता राखणे आणि आरोग्याची काळजी घेणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

तसेच तंबाखूमुक्ती आणि तंबाखूमुळे होणाऱ्या ‘मूक कॅन्सर’बाबत डॉ. मयूर जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी आणि शौचालयानंतर हात स्वच्छ धुणे, नियमित दात घासणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, स्वच्छ व सुरक्षित पाणी पिणे तसेच परिसर स्वच्छ ठेवणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

आरोग्यविषयक सवयी लहान वयातच अंगीकारल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः आरोग्यदूत बनून कुटुंबीय व परिसरातही आरोग्यविषयक जनजागृती करावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version