‘गटबाजी महत्त्वाची की एकनाथ शिंदे साहेब?’; उदय सामंतांचा धुळ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर
‘मित्रपक्ष चुकीची वागणूक देतात, अशी तक्रार करण्यापेक्षा आधी आपल्यात काय चाललंय ते बघा’; अंतर्गत गटबाजी करणाऱ्यांना शेवटची संधी
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या आढावा बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीवर तीव्र नाराजी व्यक्त करत चांगलेच कान टोचले. ‘मित्रपक्षांकडून चुकीची वागणूक मिळते, अशी तक्रार करण्यापेक्षा आधी आपल्या आपल्यात काय चालले आहे, हे पाहा. तुम्हीच समोरच्यांना संधी देत आहात,’ अशा शब्दांत सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.
‘आपल्याला गटबाजी महत्त्वाची आहे की एकनाथ शिंदे साहेब महत्त्वाचे आहेत?’ असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. धुळे जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीचा विषय गंभीर असल्याचे सांगत, यापुढेही गटबाजी सुरू राहिल्यास जिल्ह्यात नवीन टीम करण्याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
‘कालपासून मला कित्येक फोन आले. हा चांगला, तो वाईट, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात फोन आले,’ असा गौप्यस्फोट करत सामंत यांनी पदाधिकाऱ्यांमधील परस्पर तक्रारींवरही नाराजी व्यक्त केली.
‘चांगलं काम करा, मंचावरील मंडळींना हटवून तुम्हाला संधी मिळेल’
समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून सामंत म्हणाले की, ‘तुम्ही चांगले काम करा. मंचावरील मंडळींना हटवून तुम्हाला संधी मिळेल.’ मात्र त्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांच्या लंडन दौऱ्यादरम्यान त्यांचे भाषण संपल्यानंतर धुळ्यातील अंतर्गत गटबाजीबाबत आपण त्यांच्याशी चर्चा केल्याचेही सामंत यांनी बैठकीत सांगितले. अंतर्गत गटबाजी करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना ही शेवटची संधी असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीतील कमी उपस्थितीवरही नाराजी
शिवसेनेच्या आढावा बैठकीला अपेक्षेप्रमाणे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित नसल्याने उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. धुळे जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी ‘महाराष्ट्रात सर्वाधिक माजी सरकार धुळ्यात झाले’ अशी टिप्पणी केली. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर्गत गटबाजी धुळे जिल्ह्यात आढळत असल्याची खंत व्यक्त केली.
पक्षाच्या कार्यक्रमांदरम्यानही एकमेकांचा अंतर्गत विरोध दिसून येऊ नये, याची काळजी घेतली जात असल्याचे सांगत सामंत यांनी यावरही नाराजी व्यक्त केली. ‘मंचावरची सर्व मंडळी जर एकत्र आली, तर जिल्ह्यात एकमेव पक्ष असेल आणि तो म्हणजे फक्त शिवसेना,’ असे सांगत त्यांनी एकजुटीचा संदेश दिला.
अजितदादांच्या वक्तव्याचा दाखला देत कार्यकर्त्यांना सुनावले
उदय सामंत यांनी आपल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचा दाखला देत कार्यकर्त्यांचे कान टोचले. अजितदादांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत, ‘जे जवळ येऊन सत्कार करतात, त्यांची ग्रामपंचायत तरी त्यांच्याकडे आहे का, हे बघणे गरजेचे आहे,’ असे सांगत केवळ जवळीक किंवा सत्कारावरून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मूल्यमापन न करता प्रत्यक्षात त्यांचे पक्षासाठी असलेले काम आणि जनाधार तपासणे गरजेचे असल्याचा संदेश सामंत यांनी दिला.
उदय सामंत यांच्या या आक्रमक भाषणामुळे धुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता पक्षश्रेष्ठींकडून जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर कोणते निर्णय घेतले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
