पळासखेडे बु. खून प्रकरणातील संशयिताला जंगलातून अटक!
पोळ्याच्या दिवशी १८ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा खून; राजवडच्या घनदाट जंगलातून पारोळा पोलिसांची कारवाई
पारोळा / सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : पळासखेडे बुद्रुक, ता. पारोळा येथे पोळा सणाच्या दिवशी झालेल्या १८ वर्षीय शालेय विद्यार्थी मयूर दुर्वास पाटील याच्या खून प्रकरणातील फरार संशयिताला पारोळा पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अंकुश नेहरू पाटील (वय ३०, रा. पळासखेडे बुद्रुक) याला तालुक्यातील राजवड येथील घनदाट जंगलातून पहाटे सुमारे तीन वाजता पोलिस पथकाने ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोळा सणाच्या दिवशी गुरुवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून मयूर पाटील याच्यावर संशयित अंकुश पाटील याने चाकूने वार केला. या हल्ल्यात मयूर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर संशयित अंकुश पाटील हा घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याला तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी पळासखेडे बुद्रुक येथील संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, ११ रोजी मयूर पाटील याच्यावर पळासखेडे बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांचे पथक जंगलात रवाना
फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिस उपअधीक्षक विनायक कोते व पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश महाजन व पोलिस उपनिरीक्षक विजय भोंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक रवाना करण्यात आले होते.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने राजवड परिसरातील घनदाट जंगलात शोधमोहीम राबवून संशयित अंकुश पाटील याला ताब्यात घेतले. तसेच खुनासाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलिस कोठडी
अटकेनंतर संशयित अंकुश पाटील याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक विनायक कोते करीत आहेत. खून प्रकरणाच्या तपासात आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
