सारोळा शाळेत माता-पालक शैक्षणिक मेळावा उत्साहात संपन्न
माता-भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन
अहिल्यानगर प्रतिनिधी – बापुसाहेब घोडेस्वार
जामखेड : शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा, केंद्र राजुरी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे माता-पालक शैक्षणिक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच उद्देशाने शाळेतील शिक्षकांनी उपस्थित माता-भगिनींशी विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवर संवाद साधत मार्गदर्शन केले.
मेळाव्यात ‘निपुण महाराष्ट्र’ व ‘निपुण भारत’ उपक्रमांमध्ये पालकांची भूमिका, शालेय स्पर्धा परीक्षा, शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, विविध शासकीय योजनांची माहिती, बालआहार, बालसंरक्षण व बालहक्क आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पालकांनी दररोज किमान २० मिनिटे आपल्या मुलांसोबत संवाद साधण्याचे महत्त्वही शिक्षकांनी पटवून दिले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगती, त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत माता-पालकांनी संबंधित वर्गशिक्षकांशी वैयक्तिक संवाद साधून चर्चा केली.
मेळाव्याच्या सांगता प्रसंगी शाळेतर्फे पूरक आहार म्हणून शेंगदाणा-बदाम चक्की तसेच भाजीपालायुक्त पौष्टिक वाटाणा मसालेभात देण्यात आला. उपस्थितांनी या पौष्टिक मेजवानीचा आनंद घेतला.
यावेळी ग्रेड मुख्याध्यापक संदिप भालसिंग, उपाध्यापिका शबाना शेख, वृषाली खांदवे, अमृता रसाळ, पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे, राहुल लिमकर तसेच उपाध्यापक प्रशांत होळकर यांच्यासह मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.
माता-पालकांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मातांनी व्यक्त केलेली सकारात्मक भूमिका यामुळे हा माता-पालक शैक्षणिक मेळावा अत्यंत उपयुक्त व संस्मरणीय ठरला.
