शिरपूरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; व्यापारी संकुलात पाणी घुसल्याने मोठे नुकसान
करवंद नाका परिसर जलमय; दुकानांमध्ये कमरेएवढे पाणी, गणरायाच्या मूर्तीही भिजल्या; प्रशासनाकडून युद्धपातळीवर पाणी काढण्याचे काम सुरू
शिरपूर, धुळे : तब्बल सव्वा महिन्याच्या विश्रांतीनंतर शिरपूर तालुक्यात पावसाने जोरदार पुनरागमन करत शहराला अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले. प्रमुख रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आले असून, जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.
शिरपूर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या करवंद नाका परिसरातील व्यापारी संकुलात रस्त्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुकानांमध्ये कमरेएवढे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. अनेक व्यापारी पाण्यातून साहित्य बाहेर काढताना दिसून आले.
याच परिसरात गणेशोत्सवासाठी ठेवण्यात आलेल्या गणरायाच्या काही मूर्तीही पाण्यात भिजल्याने भाविकांसह मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
दरम्यान, शिरपूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून व्यापारी संकुलातील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. प्रशासनाच्या पथकांकडून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू होते.
सुमारे चार ते पाच तास झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढत जावे लागत होते. अनेक भागांतील घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
दीर्घ विश्रांतीनंतर झालेल्या या मुसळधार पावसाने शिरपूर शहराच्या पाणी निचरा व्यवस्थेचीही परीक्षा घेतली. व्यापारी, नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
