धरणगावात ग्रामीण फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुण्याचे प्रशिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शन; फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, कथाकथन आणि सोशल मीडिया वाढीचे धडे
धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशन, पिंप्री खुर्द यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी कार्यशाळेला छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमळनेर, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, चोपडा, यावल, बऱ्हाणपूर, रावेर, मुक्ताईनगर, धरणगाव, जळगाव, भुसावळ यांसह विविध भागांतील छायाचित्रकारांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला.
कार्यशाळेसाठी पुणे येथून विशेष मार्गदर्शक म्हणून पंकज देशमुख उपस्थित होते. ‘Click Hunt Films’च्या माध्यमातून ते फोटोग्राफी व दृक्माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सहभागी छायाचित्रकारांना छायाचित्र संपादन, व्हिडिओ एडिटिंग, प्रभावी कथाकथन तसेच समाजमाध्यमांवरील कामाची पोहोच वाढविण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत फोटोग्राफीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कॅमेरा हाताळणी, प्रकाशयोजना, छायाचित्राची रचना, योग्य क्षणाची निवड आणि तो प्रभावीपणे कॅमेऱ्यात टिपण्याचे बारकावे समजावून सांगण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन मिळाल्याने सहभागी छायाचित्रकारांना आधुनिक तंत्रे प्रत्यक्ष समजून घेण्याची संधी मिळाली.
‘प्रत्येक सत्रातून नवे शिकणे आणि प्रत्येक छायाचित्रातून स्वतःला अधिक चांगले घडवणे’ या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेमुळे छायाचित्रकारांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची ओळख निर्माण होण्यासोबतच सर्जनशीलतेला चालना मिळाली. तसेच व्यावसायिक कौशल्यविकासासाठीही या कार्यशाळेने नवी दिशा दिली.
ग्रामीण भागातील छायाचित्रकारांना बदलत्या काळातील आधुनिक तंत्रज्ञान आणि दृक्माध्यमांची माहिती मिळावी, त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि फोटोग्राफी व्यवसायाला नवी दिशा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यशाळेच्या आयोजनाचे उपस्थित छायाचित्रकारांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गेश गोसावी यांनी केले, तर श्याम पाटील यांनी आभार मानले.
