Spread the love

घाटनांद्रा–तिडका रस्त्याची दुरवस्था; एस.टी. बससेवा बंद

जड वाहतुकीमुळे रस्ता उखडला; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, दुरुस्ती न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

सोयगाव | प्रतिनिधी – शिवराम जाधव

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा ते सोयगाव तालुक्यातील तिडका या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्ता खराब झाल्याने या मार्गावरील एस.टी. बससेवा बंद झाली आहे. परिणामी विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून बससेवा पूर्ववत करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य शेख नसरीन शेख रईस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, जंगली कोटा मार्गे फर्दापूर ते नागद परिसरातील कामासाठी K.T.I.L. कंपनीच्या कंत्राटदारांकडून बोरमाळा तांडा परिसरातून खडी व मुरूम वाहतूक केली जात आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची ये-जा सुरू असल्याने घाटनांद्रा ते तिडका रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या मार्गावरून दररोज परिसरातील विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांसाठी, तर शेतकरी व कामगार विविध कामांसाठी प्रवास करतात. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, अपघाताचा धोका वाढला आहे.

घाटनांद्रा–तिडका मार्गाची अवस्था खराब झाल्याने या मार्गावरून पाचोरा, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड आणि सोयगावकडे ये-जा करणारी एस.टी. बससेवाही बंद झाली आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत असून, पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे संबंधित K.T.I.L. कंपनीच्या कंत्राटदारांना आवश्यक आदेश देऊन घाटनांद्रा ते तिडका रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे आणि या मार्गावरील एस.टी. बससेवा त्वरित पूर्ववत करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, रस्त्याची दुरुस्ती तातडीने न झाल्यास नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने संबंधित तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version