मुक्ताईनगर पुरवठा अधिकाऱ्यांविरोधात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार
संघरत्न सपकाळे | भुसावळ
मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेले पुरवठा अधिकारी बोंद्रे यांच्या कार्यपद्धतीविरोधात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने भुसावळ प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन देत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. लाभार्थी तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आरोप संघटनेने निवेदनातून केला आहे.
मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागासह शासकीय धान्य गोदामातील कामकाजाबाबतही संघटनेने गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांकडे शासकीय धान्य गोदामाचा कोणताही पदभार नसतानाही तेथे बसून धान्य वितरणाच्या कामकाजात हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच गोदामातील प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसलेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.
पुरवठा विभागातील रेशनकार्डसंबंधीच्या ऑनलाइन कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रलंबित प्रकरणे असून, नागरिकांची नावे वाढविणे, नावे कमी करणे यांसारखी कामेही अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा दावा संघटनेने केला आहे. आर्थिक व्यवहार केल्याशिवाय काही कामे केली जात नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धान्याचा साठा उपलब्ध असतानाही नव्या लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट केले जात नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. काही ठराविक एजंटांमार्फत आर्थिक व्यवहार करून कामे केली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांकडून मनमानी पद्धतीने हप्ते वसूल केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. २५ किंवा २३ क्विंटलसारखे कमी धान्याचे नियतन असलेल्या दुकानांकडूनही २,५०० ते ३,००० रुपये वसूल केले जात असल्याचे निवेदनात नमूद आहे. काही महिला दुकानदारांनाही वेगळ्या प्रकारचा त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करावी, पुरवठा विभागातील प्रलंबित कामकाजाचा आढावा घेऊन नागरिकांची कामे तातडीने निकाली काढावीत, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीअंती योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची इतर विभागात बदली करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
हे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत प्रभाकर भालशंकर, सुभाष बळीराम पाटील, गोपाळ पाटील, जितेंद्र लालसिंग पाटील, योगेश महाजन, आशाबाई राजेंद्र सवर्णे, शेषराव कालू पाटील, श्रीकृष्ण महिला बचत गट, रंजना गोपाळ बेलदार, स्वामी समर्थ महिला बचत गट, पंचशील महिला बचत गट, रत्नप्रभा अजाबराव पाटील यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने भुसावळ प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दुकानदार तसेच तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना न्याय न मिळाल्यास अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
