दुष्काळाच्या झळा; गंगाखेड रोडवरील सोयाबीन पीक वाळले
पावसाने ओढ दिल्याने त्तरोडा शिवारातील पिकाला फटका; पंचनामे करून आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी
गंगाखेड | प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड रोडलगतच्या त्तरोडा शिवारात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा मोठा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. त्तरोडा शिवारातील शेतकरी गंगाबाई मानिकराव शेलके यांच्या शेतातील सोयाबीन पीक पाण्याअभावी वाळून गेले असून, पिकाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाला वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आवश्यक तेवढे पाणी मिळाले नाही. परिणामी सोयाबीनच्या झाडांची पाने वाळली असून, शेंगांची वाढही समाधानकारक झालेली नाही. पिकाची सद्यस्थिती पाहता यंदाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर वाळून जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या नुकसानीचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ तसेच शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाने या नुकसानीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
