Spread the love

मांडकीच्या आदिवासी वस्तीसाठी पक्का रस्ता द्या; अन्यथा २३ सप्टेंबरला रस्ता रोको

१०० टक्के आदिवासी वस्ती मूलभूत सुविधांपासून वंचित; एकलव्य आदिवासी संघटनेचा प्रशासनाला अंतिम इशारा

पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील मौजे मांडकी येथील १०० टक्के आदिवासी लोकवस्ती आजही पक्क्या रस्त्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित असल्याने एकलव्य आदिवासी संघटनेने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आगामी सात ते आठ दिवसांत रस्त्याचे काम मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास २३ सप्टेंबर २०२६ रोजी पाचोरा-जळगाव चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, आमदार किशोर अप्पासाहेब पाटील, तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे उलटूनही मांडकी येथील आदिवासी वस्तीला पक्क्या रस्त्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. यासंदर्भात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास

पक्क्या रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना दररोज सुमारे दीड किलोमीटरचा चिखलमय रस्ता पायी पार करून शाळेत जावे लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठी डबकी साचून दलदल निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रुग्णवाहिकेलाही अडथळा

रस्त्याची सुविधा नसल्याने गावात रुग्णवाहिका तसेच इतर वाहने पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे आजारी व्यक्ती, गरोदर महिला आणि वृद्धांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आदिवासी वस्तीच्या या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि पक्क्या रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी एकलव्य आदिवासी संघटनेने केली आहे. अन्यथा २३ सप्टेंबर रोजी पाचोरा-जळगाव चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तसेच संभाव्य परिणामांना प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिलिपी : पोलीस अधीक्षक, जळगाव; उपविभागीय अधिकारी (SDO), पाचोरा; पोलीस निरीक्षक, पाचोरा पोलीस ठाणे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version