Spread the love

कार्यालयात ‘रील’ करणे तहसीलदारांच्या अंगलट; शासनाकडून गंभीर दखल

रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत चौकशी; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश

भुसावळ | संघरत्न सपकाळे :

वाशीम जिल्ह्यातील रिसोड तहसील कार्यालयात शासकीय कामकाजादरम्यान ‘सिनेमॅटिक रील’चे चित्रीकरण केल्याच्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या रिसोड तहसीलदार पदावरील संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश महसूल व वन विभागाने अमरावती विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे ‘रील’ प्रकरणामुळे तहसीलदार तेजनकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शासकीय कार्यालयातच ‘फिल्मी स्टाईल’ चित्रीकरण

तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी रिसोड तहसील कार्यालयातील शासकीय खुर्चीवर बसून, फायलींवर स्वाक्षरी करतानाचे तसेच विविध ‘फिल्मी स्टाईल’ रील्सचे चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. या रील्स समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर या प्रकाराची चर्चा सुरू झाली.

जनतेच्या शासकीय कामांसाठी असलेल्या तहसील कार्यालयाचा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी वापर केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे शासकीय कार्यालयातील प्रशासकीय शिस्त आणि नियमांच्या पालनाबाबत प्रश्न उपस्थित झाले.

शासकीय यंत्रणेच्या वापराबाबतही प्रश्न

या प्रकरणात महसूल यंत्रणेतील कर्मचाऱ्यांसह कोतवालांचाही वैयक्तिक प्रसिद्धीसाठी वापर करण्यात आल्याची चर्चा झाली. शासकीय कर्तव्याच्या वेळेत रील्सचे चित्रीकरण आणि त्यासाठी यंत्रणेचा वापर झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

विशेष पथकाकडून संपूर्ण कामकाजाची तपासणी

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी काढलेल्या शासकीय पत्रानुसार, प्रतीक्षा तेजनकर रिसोड तहसीलदार पदावर कार्यरत असताना केलेल्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांच्या अभिप्रायासह एका महिन्याच्या आत शासनाकडे सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता विशेष पथकाच्या चौकशीत नेमके कोणते तथ्य समोर येते, याकडे महसूल विभागासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version