अरुश्रीच्या राखीला पंतप्रधान मोदींचे विशेष स्नेहपत्र
रक्षा बंधनानिमित्त पाठविलेल्या राखी व शुभेच्छापत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल; विद्यार्थिनीच्या देशसेवेच्या भावनेचे कौतुक
जळगाव | प्रतिनिधी : रक्षा बंधनाच्या पावन पर्वानिमित्त रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. अरुश्री परिक्षीत बाविस्कर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशसेवा व राष्ट्रकल्याणासाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या सदिच्छेने राखी व शुभेच्छापत्र पाठविले होते. अरुश्रीने पाठविलेल्या या स्नेहबंधाची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला विशेष पत्र पाठवून कौतुक व आभार व्यक्त केले आहेत.
लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. परिक्षीत श्रीरामजी बाविस्कर आणि डॉ. सौ. स्वाती परिक्षीत बाविस्कर यांची कन्या असलेल्या अरुश्रीने आपल्या आई-वडिलांकडून मिळालेल्या सामाजिक बांधिलकीच्या संस्कारातून हा उपक्रम केला.
रक्षा बंधनानिमित्त अरुश्रीने पंतप्रधानांना पाठविलेल्या राखी व शुभेच्छापत्रातून देशाच्या नेतृत्वाविषयी असलेला आदर आणि राष्ट्रकल्याणाची भावना व्यक्त केली होती. तिचे पत्र व राखी नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तिला विशेष स्नेहपत्र पाठविले.
या पत्रातून पंतप्रधानांनी अरुश्रीच्या भावनेचे कौतुक केले. देशातील मुली व विद्यार्थिनी विकसित भारताच्या निर्मितीत विविध क्षेत्रांत योगदान देत असून, क्रीडा, कौशल्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. मुली व महिला राष्ट्रकल्याणासाठी स्वयंस्फूर्तीने योगदान देत आपल्या सामर्थ्याचा परिचय करून देत असल्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.
पंतप्रधानांकडून आलेले विशेष स्नेहपत्र मिळाल्याने अरुश्री बाविस्कर हिच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, तिच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थिदशेतच देशसेवा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची भावना जोपासण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
