धुळ्यात आढळला दुर्मिळ पांढरा नाग; सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू
देवपुरातील एकविरा पार्कमध्ये आढळला ‘अल्बिनो’ नाग; वनविभागाच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडले
धुळे : देवपुरातील झेंडा चौक परिसरातील एकविरा पार्क येथे अतिशय दुर्मिळ असा पांढऱ्या रंगाचा नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ कुतूहल निर्माण झाले. घराच्या बाजूला हा नाग आढळल्यानंतर नागरिकांनी तातडीने वॉर फाउंडेशनच्या सर्पमित्रांना माहिती दिली.
माहिती मिळताच वॉर फाउंडेशनचे सर्पमित्र चंदन ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने या नागाला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. नागाला कोणतीही इजा न होऊ देता पकडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पांढऱ्या रंगामुळे दुर्मिळतेची चर्चा
हा नाग रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे फिकट किंवा पांढऱ्या रंगाचा दिसत असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. अशा प्रकारचा साप तुलनेने दुर्मिळ असल्याने त्याच्या दर्शनाने परिसरातील नागरिकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले.
या नागाला रेस्क्यू केल्यानंतर वनविभागाचे वनरक्षक रामदास पांढरे, सर्पमित्र स्वप्नील सोनवणे तसेच इतर सर्पमित्रांच्या उपस्थितीत त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
साप दिसल्यास नागरिकांनी घाबरू नये
शहरातील रहिवासी भागात साप आढळल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा स्वतः साप पकडण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने वॉर फाउंडेशनच्या सर्पमित्रांशी अथवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
दुर्मिळ नागाचे रेस्क्यू करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडल्याने वन्यजीव संरक्षणाचा सकारात्मक संदेश या घटनेतून समोर आला आहे.
