खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा
तालुका प्रतिनिधी
जळगाव, दि. १६ सप्टेंबर : भीम आर्मी व आझाद समाज पार्टीचे संस्थापक-अध्यक्ष तथा नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर शाहाबाद येथील टोल गेटवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेची उच्चस्तरीय, निष्पक्ष, स्वतंत्र आणि कालबद्ध चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात भीम आर्मी भारत एकता मिशनच्या जळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी, जळगाव यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदया यांना निवेदन सादर करण्यात आले.
हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनेमागे कोणतेही पूर्वनियोजित षड्यंत्र किंवा सूत्रधार असल्यास त्याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन त्यांच्या सुरक्षेला असलेल्या संभाव्य धोक्याचे गांभीर्य लक्षात घेता Z+ सुरक्षा प्रदान करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेला महत्त्व असून, अशा घटनांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही व संविधानिक मार्गाने महाराष्ट्रभर शांततापूर्ण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, संदीप सपकाळे, जावेद शेख, मुबारक तडवी, विद्यासागर खरात, अल्केश मोरे, राहुल जयकर, सुपडू सदानशिव, जुम्मा तडवी, विनोद सोनवणे, अनिल मोरे, शकील शेख, वैशाली पाटील, संगीता दया, रेखा पाटील, शारदा तायडे, जय सपकाळे, चंद्रमणी मोरे, विशाल वाघमारे आदी उपस्थित होते.
