वुशुच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी झेप
जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; विभागस्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड
धरणगाव : अजय बाविस्कर
जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कृष्णा गोरख महाजन याने वुशु क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करत जिल्ह्यात आपला ठसा उमटविला आहे. जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित जिल्हास्तरीय शालेय वुशु क्रीडा स्पर्धेत कृष्णाने १९ वर्षांखालील खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत कृष्णाने आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवून विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
कृष्णाच्या या यशामुळे इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एका मानाच्या यशाची भर पडली आहे. अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असून, योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सरावातून यश संपादन करता येते, हे कृष्णाने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
कृष्णाच्या यशामागे त्याचे सातत्यपूर्ण परिश्रम तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक डी. एन. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाने नियमित सराव करत आपल्या खेळात सातत्याने सुधारणा केली.
कृष्णाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील, संचालक अश्विनकुमार पाटील, आशिषकुमार पाटील, प्राचार्या सुरेखा पाटील, उपप्राचार्य ए. एस. पाटील, पर्यवेक्षिका भारती पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने त्याचे अभिनंदन केले.
जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाची झेप घेतल्यानंतर आता विभागस्तरीय स्पर्धेतही कृष्णा महाजनकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी विद्यालयासह क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
