विज्ञान नाट्य महोत्सवात कुऱ्हा हरदो जि.प. शाळेची बाजी
‘AI : साधन, मित्र की धोका?’ नाटिकेला प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड
बोदवड : प्रतिनिधी
पंचायत समिती बोदवड अंतर्गत गटसाधन केंद्र आणि रोज पेटल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव २०२६-२७ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुऱ्हा हरदोच्या विद्यार्थ्यांनी ‘AI : साधन, मित्र की धोका?’ या विषयावर प्रभावी नाटिका सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे शाळेची जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सौ. अनिता परमार होत्या. सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सौ. परमार यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासोबतच अभ्यासाबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
यंदाच्या विज्ञान नाट्य महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना ‘विज्ञान आणि समाज’ ही होती. तालुक्यातील विविध शाळांमधील एकूण ११ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहने, अंतराळातील मानवी वस्ती, महासागराचे पुनरुज्जीवन अशा समकालीन आणि वैज्ञानिक विषयांवर नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे-धोके प्रभावीपणे मांडले
कुऱ्हा हरदो शाळेच्या विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा समाजजीवनावर होणारा परिणाम, त्याचे विविध फायदे तसेच संभाव्य धोके यांची प्रभावी मांडणी नाटिकेतून केली. विद्यार्थ्यांचा अभिनय, विषयाची सुसंगत मांडणी आणि त्यातून दिलेला सामाजिक संदेश यामुळे नाटिकेने परीक्षकांचे लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांक मिळवला.
या यशासाठी शेलवड केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी हरी नानकर आणि ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीमती कुमुदिनी माहुरे व डॉ. वैशाली संसारे यांनी नाटिकेच्या तयारीसाठी विशेष परिश्रम घेतले. शाळेतील शिक्षक सौ. पुनम वाघोदे, योगेश बोरोले, छाया बहुरूपे आणि नितीन लांडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका विज्ञान समन्वयक सौ. वनिता अग्रवाल, केंद्रप्रमुख अनिल जाधव, खंडारे सर, बीआरसी विषयतज्ज्ञ सौ. संगीता शेळके, सौ. भारती पाटे, शाळेचे प्राचार्य अरविंद वाघ तसेच तालुक्यातील विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून डॉ. वैशाली संसारे व सौ. प्रियंका पाटील यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कमोदिनी बडगुजर व सौ. राधिका जोशी यांनी केले, तर कु. साक्षी पालवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोज पेटल्स स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या कुऱ्हा हरदो जि.प. शाळेच्या विद्यार्थी, शिक्षक व मार्गदर्शकांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचेही कौतुक करण्यात आले.
