Spread the love

‘तीसचा पल्ला, आरोग्याचा सल्ला’; भोणे येथे नागरिकांची आरोग्य तपासणी

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणीसह आरोग्यविषयक जनजागृती

भोणे, ता. धरणगाव : प्रशांत शिंदे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘तीसचा पल्ला, आरोग्याचा सल्ला’ हा आरोग्यविषयक उपक्रम उपकेंद्र भोणे, ता. धरणगाव येथे राबविण्यात आला. शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या उपक्रमात नागरिकांची उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच विविध आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली.

हा उपक्रम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया बोरसे व डॉ. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

यावेळी नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून उच्च रक्तदाब व मधुमेहासारख्या आजारांची लक्षणे, नियमित तपासणीचे महत्त्व आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वेळोवेळी आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळीच निदान करणे आवश्यक असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या आरोग्य उपक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत पाटील, आरोग्य सेवक नरेंद्र पाटील, आशा स्वयंसेविका व मदतनीस उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवाच्या काळात आरोग्य तपासणी व जनजागृतीचे उपक्रम राबविल्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version