Spread the love

चक्रधर स्वामी अवतार दिन देशमुख महाविद्यालयात उत्साहात साजरा

समतावादी, मानवतावादी विचारांचा जागर; विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचा संदेश

भडगाव : गणेश रावळ

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे मराठी विभाग आणि जयंती-पुण्यतिथी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. अधिकराव पाटील यांनी केले. त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्याचा, तत्त्वज्ञानाचा आणि मानवतावादी विचारांचा परिचय करून देत त्यांच्या विचारांची आजच्या सामाजिक परिस्थितीतील उपयुक्तता स्पष्ट केली.

यावेळी चक्रधर स्वामी यांच्या समतावादी, मानवतावादी आणि समाजप्रबोधनपर विचारांचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्याची व विचारांची विद्यार्थ्यांना माहिती देताना सामाजिक समता, मानवता आणि बंधुभावाची मूल्ये समाजात रुजविण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता त्यांचे आचरणही आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती-पुण्यतिथी समितीचे प्रमुख प्रा. शिवाजी पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेची जाणीव, मानवतावादी दृष्टिकोन आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाविषयी आस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे महत्त्व विशद करण्यात आले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सचिन हडोळतीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभाग आणि जयंती-पुण्यतिथी समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version