दिनकर राठोड यांना ‘भास्कराचार्य ऋषी गौरव पुरस्कार’ जाहीर
२१ सप्टेंबरला उंबरखेड येथे पुरस्कार वितरण सोहळा; मान्यवरांची उपस्थिती
चाळीसगाव (वार्ताहर) : करगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते दिनकर राठोड यांना खान्देश बहुउद्देशीय मंडळ संचलित आणि देवगिरी प्रांत विद्या भारती संलग्न देवगिरी प्रांत शिक्षा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा ‘भास्कराचार्य ऋषी गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
दिनकर राठोड यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सरस्वती शिशु वाटिका, उंबरखेड-आडगाव रस्ता, उंबरखेड, ता. चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास चाळीसगावचे आमदार मंगेश रमेश चव्हाण, भाजप जळगाव शहर अध्यक्ष दिपक प्रभाकर सूर्यवंशी, शिक्षण सभापती पोपट एकनाथ भोळे तसेच विद्या भारती देवगिरी प्रांताचे संघटन मंत्री प्रकाश भिवसन पोलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिनकर राठोड यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विकासो करगावचे सर्व संचालक मंडळ, विनय राठोड, एकनाथ गोफणे, भागवत हडपे, कोमलसिंग जाधव तसेच वसंतराव नाईक अधिकारी-कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय राठोड यांच्यासह मित्रपरिवार आणि समाजबांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत मिळालेला हा सन्मान राठोड यांच्या कार्याचा गौरव करणारा ठरला असून, त्यांच्या निवडीबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
